बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वपक्ष जोरदार तयारीला लागले आहे. ठाकरे बंधुंच्या युतीनंतर काही ठिकाणी सेना-भाजप युती तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-सेना युती अशा अंतर्गत युती सध्या पाहायला मिळत आहे. एवढचं नव्हे तर अनेक पक्षनेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करत आहेत. असं असताना महायुती फिसकटल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचा धर्म बाजूला ठेवत सत्ताधारी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरून आता भाजप नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमिवर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी अजित पवारांच्या टीकेवर प्रत्यारोप दिले. असं असताना आता स्वतः भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुण्यातील सभेत बोलताना अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पुण्यातील कात्रज चौक येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहरातील आमदार आणि भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईमध्ये आम्हाला थोडं तरी बोलाव लागत, कारण उत्तर नाही दिलं तर आम्ही लोकांना दुर्बल वाटतो. माझा निवडणुकीचा फोकस हा पुर्ण विकासावर आहे. कारण आमचं एक तत्व आहे, शरीफ है हम किसीसे लढते नाही, वरना जमाना जानता है हम किसीके बापसे डरते नाही… मी निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार आहे. कोणी जर विचारत असेल की तुम्ही काय केल तर त्या प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे." एवढचं नव्हे तर "मुंबई बदलू असे सांगितले तेव्हा‚ मला वेड्यात काढले होते. मात्र‚ मुंबईचा विकास करून दाखविला आहे. त्यानुसार येत्या पाच वर्षात पुण्याचा चेहरा मोहरा बदलू असा विश्वासही व्यक्त करतानाच शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आगामी काळात सुमारे 80 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबविण्यात येतील", अशी घोषणा फडणवीस यांनी केली.