Delhi Red Fort Bomb Blast Investigation: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) या प्रकरणात सह-सूत्रधार जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला अटक केली आहे. तपासादरम्यान उघड झाले आहे की, दानिशची योजना 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यासारखाच हल्ला दिल्लीत करण्याची होती. यासाठी त्याने बॉम्बस्फोटातील आत्मघातकी बॉम्बर डॉ. उमर उन-नबी सोबत काम केले होते. 10 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी दानिशने ड्रोनमध्ये बदल करण्याचा आणि रॉकेट बनवण्याचा प्रयत्न केला होता.
तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी हमासने इस्रायलवर हल्ला करण्यासाठी जसे शक्तिशाली ड्रोन वापरले होते, तशाच प्रकारचा हल्ला भारतात करण्याची या मॉड्यूलची योजना होती. एका वृत्तसंस्थेने सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की, अनंतनागमधील काझीगुंड येथील रहिवासी असलेला दानिश हा कॅमेरे आणि जड बॉम्ब वाहून नेण्यासाठी ड्रोनमध्ये बदल (Modification) करत होता. सूत्रांनी सांगितले की, दानिशला लहान, सशस्त्र ड्रोन बनवण्याचा अनुभव आहे आणि तो ड्रोनमध्ये बदल करून त्यांना अधिक शक्तिशाली आणि प्राणघातक बनवण्याचे काम करत होता.
हेही वाचा – Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ला मोठे यश; दहशतवादी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक
गर्दीच्या ठिकाणी मोठा घातपाताचा कट
या दहशतवादी मॉड्यूलची मोठ्या संख्येने लोकांना ठार करण्याची योजना होती. व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलमधील दहशतवाद्यांनी गर्दीच्या भागात अत्यंत घातक बॉम्ब असलेले ड्रोन पाठवण्याची योजना आखली होती. हमाससारख्या संघटनांनी प्राणघातक हल्ले करण्यासाठी अशाच प्रकारच्या युक्त्या वापरल्या आहेत. प्राणघातक दहशतवादी हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर आता सामान्य होत चालला असून, अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या देशांनी त्यांच्या तांत्रिक क्षमतेच्या आधारावर तयारी केली आहे.
बॉम्बरला तांत्रिक मदत
पीटीआयच्या वृत्तानुसार, दानिशने डॉ. उमर उन-नबी याला भारतात प्राणघातक दहशतवादी हल्ले करण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक मदत पुरवली होती. या मदतीमध्ये ड्रोनमध्ये बदल करणे आणि रॉकेट निर्मितीचा समावेश होता. एनआयएच्या पथकाने दानिशला श्रीनगरमधून अटक केली असून, तो दिल्ली बॉम्बस्फोटातील सह-सूत्रधार आहे. त्याने दहशतवादी उमर उन-नबी याच्यासोबत काम केले असल्याचे सिद्ध झाले आहे.
हेही वाचा – Delhi Blast: शू बॉम्बने झाला दिल्ली ब्लास्ट? तपासात समोर आले थरकाप उडवणारे पुरावे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.