Dattatray Bharane: दत्तात्रय भरणेंच्या तोंडून ‘दिवंगत उद्धव ठाकरे’ असा उल्लेख; इंदापूरच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

इंदापूरमधील बाबीर देवाच्या कार्यक्रमात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तोंडून ‘दिवंगत उद्धव ठाकरे’ असा उल्लेख झाला. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Dattatray Bharane: दत्तात्रय भरणेंच्या तोंडून ‘दिवंगत उद्धव ठाकरे’ असा उल्लेख; इंदापूरच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रुई-बाबीर येथे बाबीर देवाच्या कलशारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महादेव जानकर आणि हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र कार्यक्रमातील कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भाषणातील एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

कार्यक्रमादरम्यान दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात झालेल्या विविध विकासकामांचा उल्लेख केला. या कामांसाठी ज्यांनी सहकार्य केलं, त्यांच्या नावांचा उल्लेख करत असताना भरणे यांच्या तोंडून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्यानंतर ‘दिवंगत उद्धव ठाकरे’ असा उल्लेख झाला.

मात्र उद्धव ठाकरे हे हयात असल्याने भरणे यांच्या या वक्तव्याची लगेचच चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, भाषण सुरू असताना हा चुकीचा उल्लेख त्यांच्या लक्षात आला नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना चिठ्ठी देऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

कार्यकर्त्यांकडून चिठ्ठी मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात या चुकीच्या उल्लेखाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. हा उल्लेख अनवधानाने झाल्याचं स्पष्ट करत त्यांनी आपली चूक मान्य केली.

या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ चर्चेला उधाण आलं. विशेष म्हणजे, एकीकडे मंचावर राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित असताना कृषिमंत्र्यांकडून झालेल्या या चुकीच्या उल्लेखाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं

दरम्यान, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती होती. बाबीर देवाच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमासोबतच राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळेही या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं.

मात्र संपूर्ण कार्यक्रमात दत्तात्रय भरणे यांच्या भाषणातील ‘दिवंगत उद्धव ठाकरे’ हा उल्लेख चर्चेचा विषय ठरला. कार्यकर्त्यांनी वेळेत चिठ्ठी देऊन लक्ष वेधल्यानंतर भरणे यांनी लगेचच दिलगिरी व्यक्त केल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आता या चुकीच्या उल्लेखावर राजकीय वर्तुळातून कोणत्या प्रतिक्रिया उमटतात, याकडे लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number