पुण्यातील गवर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज मधील कॅन्टीन, वसतिगृह आणि इतर सुविधांची पाहणी करण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या सुविधांची पाहणी करण्यास गेलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो पाहिल्याबरोबर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना 'काढ रे तो फोटो….', असे आदेश देत पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजच्या कार्यालयातील पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला लावला.
यानंतर पुण्यात चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनला अमित ठाकरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला होता. आज दुपारी अमित ठाकरे यांनी पुण्यातील गव्हर्मेंट पॉलीटेक्निक महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यास सांगितले होते. त्यानंतर यासंदर्भात प्राचार्यांनी चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. प्राचार्यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
तसेच पुण्यातील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या कार्यालयातील अमित ठाकरे यांनी काढलेला नरेंद्र मोदी यांचा फोटो महाविद्यालय प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडून प्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यात आला होता ते फोटो महाविद्यालय प्रशासनाकडून पुन्हा लावण्यात आला आहे.
यावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, "अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलं. ते मनसेचे नवे नवे झालेले नेते आहेत. हा प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल च्या माध्यमातून हे सगळं होतं. ते शासकीय कॉलेज आहे. फोटो काढण्याच्या आधी प्रोटोकॉल वाचायला हवा होता. ते नव्याने घराच्या बाहेर पडले आहेत घरात बसणाऱ्यांना प्रोटोकॉल माहिती नसतो. भारतीय पंतप्रधानांचा फोटो प्रत्येक शासकीय कार्यालयात असतो."