Cockroach Janta Party Delhi Protest : देशभरात विविध शैक्षणिक आणि सरकारी भरती परीक्षांमध्ये झालेल्या मोठ्या गैरव्यवहारामुळे आणि वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या सत्रामुळे देशातील तरुण वर्ग प्रचंड आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आज दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर हजारो विद्यार्थी आणि तरुणांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. सोशल मीडियावरून सुरू झालेली ही डिजिटल चळवळ आता थेट रस्त्यावर उतरली असून, ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांनी या भव्य आंदोलनाचे थेट नेतृत्व केले. आज सकाळीच भारतात परतलेल्या दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी थेट दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग फुंकले असून, या आंदोलनामुळे जंतर-मंतर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
पोस्ट डिलीट करू शकता, पण आम्हाला नाही!
आंदोलनाला संबोधित करताना अभिजित दिपके यांनी सरकारवर आणि प्रशासनावर कडक शब्दांत प्रहार केला. 'आपला हा लढा खूप मोठा असून आम्ही गेल्या महिन्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत,' असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस कारवाई करण्याऐवजी आमचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक केले जात असून आंदोलनाशी संबंधित पोस्ट डिलीट करण्याचे काम केले जात आहे. 'तुम्ही आमच्या पोस्ट नक्कीच डिलीट करू शकता, पण आम्हा तरुणांना इथून हटवू शकत नाही,' असा थेट इशारा त्यांनी दिला. विशेष म्हणजे, या आंदोलनादरम्यान दिपके यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र पाहायला मिळाले; ज्याची दखल एका वृत्तसंस्थेने घेत याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
हेही वाचा – Sonam Wangchuk: 'CJP च्या कोणत्याही सदस्याला अटक झाल्यास…' सोनम वांगचुक यांचा सरकारला गंभीर इशारा
आंदोलनकर्त्यांच्या 5 प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे –
1. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा : नीट (NEET) पेपर लीक प्रकरण आणि सीबीएसईच्या (CBSE) ‘ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टम’मधील कथित अनियमिततेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा.
2. योग्य प्रशिक्षणाशिवाय घाईघाईने डिजिटल शिक्षण नको : शिक्षण क्षेत्रात कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी शिक्षकांना त्याचे योग्य प्रशिक्षण आणि मूल्यमापन दिले जावे. डिजिटल प्रणालीमुळे परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार आधी पूर्णपणे रोखले जावेत.
3. मणिपूरमधील शिक्षण व्यवस्था पूर्ववत करा : गेल्या 3 वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अनौस्थेमुळे आणि हिंसाचारामुळे तेथील शाळा तसेच महाविद्यालये पूर्णपणे विसकळीत झाली आहेत. तिथल्या विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी करून शैक्षणिक व्यवस्था तातडीने सुरळीत करावी.
4. स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता : देशातील लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे एका छोट्या खोलीत राहून अत्यंत कठीण परिस्थितीत परीक्षांची तयारी करतात. मात्र, पेपर फुटीमुळे त्यांच्या कष्टावर पाणी फेरले जाते, त्यामुळे परीक्षांमध्ये पारदर्शकता आणून त्यांची विश्वासार्हता सरकारने टिकवून ठेवावी.
5. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी आणि उत्तरदायित्व : परीक्षांमधील सातत्यपूर्ण गोंधळामुळे आणि अनिश्चिततेमुळे लाखो विद्यार्थी सध्या प्रचंड मानसिक दबावाखाली आहेत, तर काहींनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले आहे. या संपूर्ण परिस्थितीला प्रशासनाने स्वतःला जबाबदार धरून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
अनोखे आंदोलन आणि घोषणाबाजीने दणाणला परिसर
जंतर-मंतरवरील या आंदोलनाचे स्वरूप अत्यंत अनोखे होते, ज्यामध्ये शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, त्रस्त पालक आणि तरुण व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर कॉक्रोचचे (झुरळाचे) मास्क लावले होते आणि हातात फुले घेतली होती. आंदोलनस्थळी उपस्थित तरुणांनी 'धर्मेंद्र प्रधान, राजीनामा द्या!' अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता, तसेच आंदोलनात 'जय भीम'च्या घोषणाही मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. रस्त्यावरील या थेट संघर्षामुळे आता केंद्र सरकारवरील राजकीय दबाव कमालीचा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.