Vasant More Speech: शिवसेना (ठाकरे गट) नेते वसंत मोरे यांनी भाजपच्या जाहीरनाम्यांचा दाखला देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शहरातील प्रलंबित प्रश्नांची यादीच वाचून दाखवत मोरे यांनी भाजपच्या कामगिरीवर तीव्र टीका केली. त्यांचे हे आक्रमक भाषण शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरेही लक्ष देऊन ऐकत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. वसंत मोरे यांनी सांगितले की, भाजपने शहरासाठी 26 मुद्द्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. मात्र, त्यातील बहुतांश आश्वासने आजही अपूर्ण आहेत. पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरातील विविध ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र, फक्त सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले, उर्वरित घोषणा कागदावरच राहिल्या, असा आरोप त्यांनी केला.
आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
शहरातील आरोग्य व्यवस्थेवरही मोरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भाजपच्या सत्ताकाळात एकही नवीन रुग्णालय उभारण्यात आलेले नाही, तसेच जुन्या रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, असे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयातील ICU मध्ये रुग्णाला उंदराने कुरतडल्याची घटना घडली होती, याकडे लक्ष वेधत त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका केली.
पाणी, वाहतूक आणि बीआरटीचा मुद्दा
पाण्याच्या प्रश्नावर बोलताना मोरे म्हणाले की, शहरासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त पाणी अद्याप मंजूर झालेले नाही आणि प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. तसेच भाजपने बीआरटी मार्गांवर मोफत बससेवेची घोषणा केली होती, मात्र आज सर्व बीआरटी मार्ग बंद झाल्याचे चित्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
क्रीडा व सांस्कृतिक सुविधांवर अपयश
भाजपच्या जाहीरनाम्यात नवीन क्रीडांगणे उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, एकही नवीन क्रीडांगण प्रत्यक्षात उभे राहिलेले नाही, असे मोरे म्हणाले. प्रत्येक प्रभागात सांस्कृतिक केंद्र उभारण्याची घोषणा देखील केवळ आश्वासनापुरतीच राहिली असल्याचा आरोप त्यांनी केला. एकूणच, भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची आठवण करून देत वसंत मोरे यांनी शहराच्या विकासाबाबत भाजप पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.