गणेशोत्सवाला आज पासून प्रारंभ झाला आहे. घरोघरी भक्तीभावाने श्रीगणेशाची स्थापना केली जात असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहेत. आज सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. गणेशभक्तांमध्ये बाप्पाच्या आगमनाचा उत्साह दिसून येतो आहे. राज्यभरात गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली असून, सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले आहे.
तब्बल 12 दिवस हा बाप्पांचा जल्लोष सुरू राहणार आहे.आज सकाळ पासूनच ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना नागरिकांनी केली. गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन होत असून, भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत आहे. कुठे ढोल-ताशांचा गजर, कुठे टाळ-मृदंगाचा निनाद, तर कुठे पारंपरिक वाद्यांच्या साथीने बाप्पाचे भक्तिमय स्वागत केले जात आहे.
श्रद्धा आणि भक्तीच्या या वातावरणात राज्यातील राजकारणी देखील आनंद घेताना दिसले. विशेष म्हणजे राजकारणातील वेगवेगळ्या विचारसरणीचे नेतेही गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकत्रितपणे गणपती बाप्पाचा जयघोष करत गणरायाचे स्वागत केले आहे.
यावेळी आंबादास दानवे, संजय शिरसाट आणि अतुल सावे हे नेते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. बाप्पाच्या आगमनाच्या आनंदात तिघांनीही उत्स्फूर्तपणे नाचत जल्लोष केला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून गणेशोत्सवाच्या निमित्ताने नेत्यांनी एकत्र येत आनंद व्यक्त केल्याचे हे दृश्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.