Chhagan Bhujbal Reaction on Prashant Kishor Sunetra Pawar Meeting: उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. प्रशांत किशोर यांची पक्षाच्या राजकीय सल्लागारपदी नियुक्ती होणार असल्याच्या चर्चांवरून पक्षांतर्गत टीकेचे सूर उमटू लागले आहेत. आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या या विषयाला फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
‘सुनेत्रा पवारांना कोणाला भेटायचे हा त्यांचा अधिकार’ – छगन भुजबळ
प्रशांत किशोर यांच्या भेटीवर भाष्य करताना छगन भुजबळ यांनी पक्षाची बाजू मांडली. सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असून त्यांनी कोणाला भेटावे हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे, त्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, असे भुजबळ म्हणाले. प्रशांत किशोर यांनी नवीन उपमुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली असू शकते. अशा अनेक भेटी होत असतात. मात्र, त्यांची राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याचे वाटत नाही. तसेच, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दिल्लीत संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने देवगिरी येथील बैठकीस उपस्थित राहू शकले नसतील, असे स्पष्टीकरणही भुजबळांनी दिले.
‘मला कुठल्या रणनीतीकाराची गरज नाही’, सुनील तटकरेंचा थेट टोला
यापूर्वीच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र रणनीतीकाराच्या गरजेबाबत थेट आणि आक्रमक शब्दांत आपले मत मांडले. मी माझ्या राजकीय आयुष्यात 8 वेळा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असून मला राज्याचा कानाकोपरा माहिती आहे, त्यामुळे मला कोणत्याही सर्व्हे किंवा रणनीतीकाराची आवश्यकता नाही, असे तटकरेंनी ठणकावून सांगितले. प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात किंवा नाही, याची मला काहीही माहिती नाही; जर त्यांची नियुक्ती झाली असती तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मला ती नक्कीच माहिती असती, असेही ते म्हणाले.
विरोधकांचे ताशेरे आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत अस्वस्थता
या घडामोडींवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही उपरोधिक टीका केली. प्रशांत किशोर हे राजकीय सल्लागार नसून केवळ टेंडर घेण्यासाठी आले असतील, असा टोला पटोलेंनी लगावला. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आणि प्रदेशाध्यक्षपदात बदलाचे संकेत दिल्याचा दावा केला जात असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि अस्वस्थता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.