Gas Leakage In Andheri: मुंबईत अंधेरी पूर्व भागात शनिवारी संध्याकाळी घडलेल्या रासायनिक गॅस गळतीच्या घटनेने परिसरात मोठी धांदल उडाली. भांगरवाडीतील एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळील तीन मजली इमारतीत झालेल्या या गळतीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जणांना गंभीर स्वरूपाचा त्रास झाला आहे. भांगरवाडी परिसरातील इमारतीत अचानक तीव्र वास आणि श्वसनास त्रास जाणवत असल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन विभागाला दिल्यानंतर तातडीने पथके घटनास्थळी दाखल झाली. इमारतीतून बाहेर काढण्यात आलेल्या तीन नागरिकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या रासायनिक गॅसची गळती नक्की कशी झाली, कोणत्या पदार्थातून झाली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने इमारतीला वेढा घालून तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरातील हवा स्वच्छ आहे की नाही आणि आणखी कोणी प्रभावित झाले आहे का, याबाबतही चौकशी सुरू आहे.
हेही वाचा – Sanjay Raut Tweet: मुंबई निवडणुकीत नवा ट्विस्ट! राऊतांच्या विधानाने माविआचे समीकरण बिघडले?
आगीचा धोका टळला
गॅस गळतीसोबत आग लागण्याचा धोका असतो, मात्र या ठिकाणी कोणतीही आग लागल्याची नोंद नाही. त्यामुळे मोठे नुकसान टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अंधेरी परिसरात यापूर्वीही गॅस गळतीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या संपूर्ण परिसरात सुरक्षा उपाय वाढवण्यात आले असून इमारतीची तपासणी सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.