Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या गोटात मोठा उद्रेक पाहायला मिळाला. प्रभाग 20 मधून उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या कट्टर कार्यकर्त्या दिव्या मराठे यांनी थेट पक्षाच्या कार्यालयाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेत्यांच्या केबिनवर हल्ला आणि पोलिसांची धावपळ
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप कार्यालयात 'एबी' फॉर्मच्या वाटपासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, अनेक निष्ठावंतांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे समजताच कार्यकर्त्यांचा संयम सुटला. दिव्या मराठे आणि त्यांच्या समर्थकांनी थेट राज्याचे मंत्री अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड यांच्या केबिनचे दरवाजे तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि पेट्रोल ओतलेल्या दिव्या मराठे यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला
हेही वाचा – BMC Election 2026 : 'हा अपमान मी कदापि सहन करणार नाही…', जागावाटपारून रामदास आठवलेंचा संताप
आम्ही रस्त्यावर संघर्ष करायचा आणि नेत्यांच्या बायका एसीमध्ये बसणार?
आपल्या 18 वर्षांच्या निष्ठेचा भाजपने अपमान केल्याचा आरोप दिव्या मराठे यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपला संताप व्यक्त केला. 'पक्षासाठी मी 15 गुन्हे अंगावर घेतले. मुलं लहान असताना घरादाराचा विचार न करता रस्त्यावर उतरून पक्ष वाढवला. आज पक्ष सत्तेत आल्यावर आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना कचऱ्यासारखं बाहेर काढलं जातंय. नेत्यांच्या बायका घरी एसीमध्ये बसतात आणि आम्ही मात्र रस्त्यावर लाठ्या खायच्या का?'
निष्ठावंतांचा बंड पुकारण्याचा इशारा
केवळ दिव्या मराठेच नव्हे, तर भाजपमधील अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही कार्यकर्त्यांनी तर निवडणूक लढवण्यासाठी आपल्या नोकऱ्याही सोडल्या होत्या. ऐनवेळी पक्षाने उमेदवार बदलल्यामुळे या कार्यकर्त्यांनी आता स्थानिक नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे आणि पक्षपाताचे गंभीर आरोप केले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.