Salil Deshmukh Resigns: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राज्यात आधीच राजकीय तापमान चढलेले असताना, आता शरद पवार गटाला एक मोठा धक्का बसला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र आणि पवार गटातील सक्रिय चेहरा म्हणून ओळखले जाणारे सलिल देशमुख यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना थेट पत्र
सलिल देशमुख यांनी आपला औपचारिक राजीनामा थेट शरद पवारांसह सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यामुळे हा निर्णय केवळ औपचारिक नसून अनेक संकेत देणारा म्हणून पाहिला जात आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर दिलेल्या या राजीनाम्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा – Manoj Jarange : मनोज जरांगे आक्रमक; म्हणाले, 'धनंजय मुंडेला वाचवण्याची किंमत पवार-फडणवीसांना मोजावी लागणार'
देशमुखांनी सांगितलं राजीनाम्याचं कारण
दरम्यान, राजीनाम्याचे कारण विचारले असता सलिल देशमुख यांनी आरोग्य बिघडल्याचा दाखला देत काही महिन्यांपर्यंत विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सक्रिय राजकारणातून तात्पुरते बाजूला होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भविष्यात पक्षांतराची शक्यता विचारल्यावर त्यांनी कोणताही ठाम इशारा दिलेला नसला तरी, प्रश्न टाळल्याने अनेक तर्कविर्तक लावण्यात येत आहेत.
राजकीय कारकीर्द
देशमुख यांनी आपल्या पत्रात नमूद केले की ते जवळपास दोन दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये सक्रिय होते. नागपूर आणि विदर्भातील युवक संघटनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनेक विकासकामांचे नेतृत्व त्यांनी केले. आरोग्य ढासळल्याने पुढील सहा महिने कोणतेही राजकीय दायित्व पार पाडणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय होण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय पटलावर नवे प्रश्नचिन्ह
शिंदे गट आणि भाजपाकडे वाढत्या प्रमाणात होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे राज्याची राजकीय दिशा झपाट्याने बदलत आहे. अशा वेळी पवार गटातील हा धक्का अचानक आणि महत्त्वपूर्ण म्हणून पाहिला जात आहे. सलिल देशमुख यांचा निर्णय खरोखरच केवळ आरोग्यापुरता मर्यादित आहे का, की या पाठीमागे आणखी काही राजकीय आखाडा तयार होत आहे? यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.