रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णायक संकेत मिळत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून रायगडच्या पालमंत्रीपदावरुन शिवसेना आणि दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आग्रही असल्याचं बघायला मिळत आहेत. नुकतेचं माणगावच्या एका सोहळ्यात बोलताना गोगावले यांनी पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे संकेत दिले होते.
पालकमंत्रीपदाबाबत अधिकृत घोषणा बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंदाच्या 15 ऑगस्ट रोजी रायगडचा पालकमंत्री म्हणून आपणच ध्वजवंदन करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. असं असताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा आजच सुटण्याची शक्यता वर्तावली जात आहे.
आज संध्याकाळपर्यंत रायगडच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यात येईल अशी माहिती शिवसेना शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी दिली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये त्यावर चर्चा झाली.
त्यानंतर आज संध्याकाळी रायगडच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर करू असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. तर रायगडचा पालकमंत्री 100 टक्के भरत गोगावले होणार आणि दुसरा कोण आहे? असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार असून रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची वर्णी लागणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.