मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत एका तरुणीला कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांसह ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकॉकहून मुंबईत परतलेल्या 29 वर्षीय तरुणीच्या सामानातून मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत तब्बल 11 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे संबंधित प्रवाशीची चौकशी केली. तिच्या हालचाली आणि प्रवासाच्या तपशीलावरून संशय निर्माण झाल्यानंतर अधिक तपास करण्यात आला. सुरुवातीला वैयक्तिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र, तिच्या सामानाची बारकाईने तपासणी केल्यानंतर मोठा खुलासा झाला.
अधिकाऱ्यांना तिच्या ट्रॉली बॅगेत अत्यंत कौशल्याने लपवून ठेवलेली 12 व्हॅक्यूम-सील पॅकेट्स सापडली. या पॅकेट्समध्ये उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक गांजा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. नंतर एनडीपीएस फील्ड टेस्टिंग किटच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली असता हा अंमली पदार्थ असल्याची पुष्टी झाली. जप्त करण्यात आलेल्या मालाचे एकूण वजन सुमारे 11.824 किलो असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेली तरुणी एका खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय ती मॉडेलिंग आणि ग्लॅमर क्षेत्राशीही संबंधित असल्याचे तपासात उघड झाले. काही काळापूर्वी तिने एका नामांकित सौंदर्य स्पर्धेत उपविजेतेपदही मिळवले होते.
सीमा शुल्क विभागाने तिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीचे मोठे जाळे असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
सध्या तपास यंत्रणा या ड्रग्जचा पुरवठा कुठून झाला, तो कोणाकडे पोहोचवला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.