Bal Mane Speaks about Nomination Withdrawal : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर नाट्यमयरित्या आपली उमेदवारी मागे घेणाऱ्या बाळ माने यांनी अखेर आपल्या निर्णयामागचे खरे कारण उघड केले आहे. माघार घेतल्यानंतर सर्वप्रथम ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकला. महाविकास आघाडीमध्ये कोणताही अंतर्गत वाद निर्माण होऊ नये आणि संभाव्य घोडेबाजार टाळता यावा, याच हेतूने आपण वरिष्ठ नेत्यांशी सविस्कर चर्चा करून हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सूचक न मिळणे आणि देवदर्शनाचे निमित्त; माने यांनी सांगितला ‘तो’ घटनाक्रम
आपल्या उमेदवारी अर्जाबाबतची सविस्तर माहिती देताना बाळ माने म्हणाले की, उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस हा 4 तारीख असा निश्चित करण्यात आला होता. मी 3 तारखेलाच आपला अर्ज दाखल केला होता. नियमानुसार एका उमेदवारी अर्जासाठी 10 सूचक आवश्यक असतात, या हिशोबाने मी एकूण 4 अर्ज भरले होते ज्यासाठी मला 40 सूचकांची गरज होती. परंतु, महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष जसे की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस किंवा शेतकरी कामगार पक्ष यांच्याकडून मला एकही सूचक मिळाला नाही. तरीही मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मतदारांच्या सह्या घेऊन माझा अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यानंतर जेव्हा मी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली, तेव्हा अनेक मतदार हे आधीच देवदर्शनासाठी घराबाहेर गेल्याचे माझ्या निदर्शनास आले, ज्यामुळे पुढील गणिते बदलली.
घोडेबाजाराची शक्यता आणि 55 मतांचे गणित; वरिष्ठ नेत्यांच्या संमतीने माघार
पुढे बोलताना बाळ माने यांनी मतदारसंघातील राजकीय गणिते स्पष्ट केली. या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडे एकूण 200 ते 225 च्या आसपास मतदार आहेत. या एकूण मतदारांपैकी केवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे स्वतःचे 55 मतदार आहेत. मला जर फक्त एवढीच मर्यादित मते मिळाली असती, तर महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि पक्षांमधील विसंवाद संपूर्ण समाजासमोर उघड झाला असता. याच परिस्थितीचा फायदा घेऊन निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ (Horse-trading) सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. हा संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी मी स्वतः विचार केला, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना या सर्व परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली आणि त्यांच्याशी सल्लामसलत करूनच अखेर माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – महाविकास आघाडीत उभी फूट? शरद पवार गटाकडून विश्वासघात झाल्याचा ठाकरे सेनेच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.