मुंबई : दिवंगत अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने राज्याचे राजकारण पार ढवळून निघाले. सत्तेत असलेल्या महायुतीसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अस्वस्थ झाले. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह राज्याचे अर्थ विभाग सांभाळणे यांचीही महत्त्वाची जबाबदारी होती. परंतू अजितदादा यांच्या अकाली निधनाने त्यांचे अर्थखातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरते स्वतःकडे घेतले. तर अजित पवार यांची पत्नी, खासदार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. आता अजित पवार यांना जाऊन चार महिने पूर्ण होत आहेत. तेव्हा राष्ट्रवादीचे अर्थखाते पुन्हा पक्षाकडे यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे.
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी सुनील तटकरे, छगन भुजबळ, पार्थ पवार, जय पवार हेदेखील सहभागी झाली होते. यावेळी आमदारांनी अर्थखाते आता राष्ट्रवादी पक्षाकडे यायला हवे अशी मागणी केली. अजितदादांच्या निधनानंतर लगेचच राज्याचे अर्थ बजेट मांडले जाणार होते. त्यामुळे नव्याने उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या आणि दुःखात असलेल्या सुनेत्रा पवार यांना ही जबाबदारी न देता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीचे अर्थ बजेट मांडले. परंतू आता महायुतीत ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादीकडे अर्थखाते यावे, अशी मागणी आमदार करत आहे.