Sleeper Vande Bharat Train : विमानासारखा प्रवास आता रेल्वेनेही अनुभवता येणार आहे! भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी 'मेगा प्लान' तयार केला असून, तब्बल 260 वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Sleeper Trains) तयार करण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत केली आहे. सध्याच्या चेअर कार वंदे भारत गाड्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता स्लीपर कोचमुळे रात्रीचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.
260 गाड्यांचे लक्ष्य आणि स्वदेशी डिझाइन
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तरात माहिती दिली की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन पूर्णपणे स्वदेशी डिझाइनचा वापर करून विकसित केल्या जात आहेत. सध्या या गाड्यांचे दोन रेक (संच) तयार झाले असून, त्यातील पहिली गाडी हावडा ते कामाख्यादरम्यान प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. तर दुसऱ्या रेकच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून तो लवकरच रुळावर येईल. येणाऱ्या काळात एकूण 260 गाड्या तयार करण्याचे नियोजन असून, यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात हाय-स्पीड स्लीपर प्रवास उपलब्ध होईल.
आधुनिक सुरक्षा आणि 'कवच' तंत्रज्ञान
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या गाड्यांमध्ये जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. यामध्ये 'कवच' (KAVACH) ही स्वदेशी ट्रेन कोलिजन अव्हायडन्स सिस्टीम बसवण्यात आली आहे. याशिवाय, धक्के जाणवू नयेत म्हणून विशेष कपलर्स (Couplers) आणि आग लागल्यास त्वरित शोध घेणारी यंत्रणा (Fire Detection System) यात असेल. गाड्यांचा कमाल वेग 180 किलोमीटर प्रतितास असून त्या 160 किलोमीटरच्या वेगाने धावण्यासाठी सक्षम आहेत.
हेही वाचा – Solapur News : सोलापूर-मराठवाडा रेल्वेसाठी राज्य शासनाकडून 150 कोटी मंजूर; रखडलेल्या प्रकल्पाला मोठा बूस्टर
स्वच्छतेसाठी शौचालयांमध्ये अत्याधुनिक सेन्सर्स आणि हवेतील बॅक्टेरिया मारण्यासाठी 'UV-C' लॅम्प तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, डब्यांमधील स्वच्छतेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून, यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. तसेच, स्थानकांवर आणि डब्यांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी 'रेल्वे स्वच्छता मोहीम' अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे. नवीन स्लीपर कोचमध्ये दिव्यांगांसाठी विशेष शौचालयांची व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीत चालक किंवा गार्डशी संवाद साधण्यासाठी 'टॉक-बॅक' युनिट्स बसवण्यात आले आहेत.
टप्प्याटप्प्याने विस्तार आणि 'अमृत भारत'चे सहकार्य
हा प्रकल्प 'भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड' (BEML) आणि चेन्नई येथील 'इंटिग्रल कोच फॅक्टरी' (ICF) यांच्या मदतीने राबवला जात आहे. प्रवाशांची मागणी आणि मार्गांची तयारी लक्षात घेऊन या गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील. वंदे भारत व्यतिरिक्त रेल्वे प्रशासन नमो भारत (Namo Bharat), अमृत भारत (Amrit Bharat) आणि LHB कोचेसची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.