Mamata Banerjee: ‘मुख्य निवडणूक आयुक्तांना अटक करा…’; ममता बॅनर्जींची मोठी मागणी; नेमकं काय म्हणाल्या?

दोन निवडणूक आयुक्तांनी 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेतील गंभीर अनियमिततांवर आक्षेप नोंदवल्याचे या वृत्तात समोर आल्यानंतर बॅनर्जी यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य केले आहे.

Mamata Banerjee: ‘मुख्य निवडणूक आयुक्तांना अटक करा…’; ममता बॅनर्जींची मोठी मागणी; नेमकं काय म्हणाल्या?
मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य

Mamata Banerjee: ‘इंडियन एक्सप्रेस’च्या एका खळबळजनक वृत्तावर प्रतिक्रिया देताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दोन निवडणूक आयुक्तांनी ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेतील गंभीर अनियमिततांवर आक्षेप नोंदवल्याचे या वृत्तात समोर आल्यानंतर बॅनर्जी यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य केले आहे. एका विशेष व्हिडिओ निवेदनाद्वारे त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची थेट मागणी केली असून, या मुद्द्यावरून संपूर्ण देशात व्यापक आंदोलन छेडण्याची घोषणाही केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात आणि देखरेखीखाली ज्या-ज्या मतदारसंघांमध्ये निवडणुका झाल्या आहेत, तिथे पुन्हा नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात, असा ठाम आग्रह त्यांनी धरला आहे.

ज्ञानेश कुमार यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही

आपल्या व्हिडिओ निवेदनात अत्यंत आक्रमक पवित्र्यात ममता बॅनर्जी म्हणाल्या, “हे खरोखरच अत्यंत धक्कादायक आणि लज्जास्पद आहे. आमच्या संपूर्ण राजकीय आयुष्यात आम्ही अशी परिस्थिती कधीही पाहिलेली नाही. अशा मुख्य निवडणूक आयुक्तांना (ज्ञानेश कुमार) तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यांना आता या घटनात्मक पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही.” भाजपवर टीका करताना त्या पुढे म्हणाल्या की, भाजपने हे नीट समजून घेतले पाहिजे की ते देशाची राज्यघटना आणि लोकशाही कोणत्याही परिस्थितीत मोडीत काढू शकत नाहीत. भाजपच्या आयटी सेलप्रमाणे काम करणाऱ्या आपल्या मर्जीतील लोकांना ईआरओ (EROs) म्हणून नियुक्त केले जात असून, आम्ही आधी केलेले सर्व आरोप आता तंतोतंत खरे ठरले आहेत.

हेही वाचा – भाजपचा राष्ट्रीय पातळीवर मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्रातील 4 बड्या नेत्यांकडे सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

पोलीस यंत्रणेचा गैरवापर अन् भाजपशी संगनमताचा आरोप

ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या, “ज्ञानेश कुमार यांनी भाजपशी संगनमत करून भाजपधार्जिण्या अधिकाऱ्यांची आणि व्यक्तींची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली. इतक्या मोठ्या प्रमाणावरील निवडणूक घोटाळा देशाच्या इतिहासात यापूर्वी कधीही झालेला नाही. जर तुमच्यात थोडीही लाज किंवा सद्सविवेकबुद्धी शिल्लक असेल, तर तुम्ही स्वतःहूनच तुमच्या अटकेची मागणी केली पाहिजे.” निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप नोंदवल्यामुळेच आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा प्रयत्न झाला, असा खळबळजनक दावाही त्यांनी या वेळी केला.

विरोधी पक्षांना दाबण्यासाठी पोलिसांचा वापर

विरोधी पक्षांना संपवण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून पोलिसांचा वापर केला जात असल्याचा पुनरुच्चार बॅनर्जी यांनी केला. देशात यापूर्वी एवढा मोठा आणि नियोजनबद्ध घोटाळा कधीच झाला नव्हता, असा दावा त्यांनी केला. पोलीस कर्मचारी थेट लोकांच्या घरी जाऊन त्यांना एका विशिष्ट राजकीय पक्षात सामील होण्यासाठी दबाव आणत आहेत आणि त्यांनी असा दबाव मानण्यास नकार दिल्यास त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात आहे, असा गंभीर आरोप करत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number