Amol Kolhe on PM Modi: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका विडंबनात्मक कवितेच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि कोसळलेली अर्थव्यवस्था या मुद्द्यांवरून त्यांनी “दाढीवाला बाबा वदला, चला पटापट सवयी बदला” अशा ओळी म्हणत सरकारचा समाचार घेतला आहे.
महागाई आणि सामान्य जनतेचे हाल
कोल्हे यांनी आपल्या कवितेत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आणि सोन्याचे वाढते दर यावर टीका केली. “नको आता परदेशवारी, अर्थव्यवस्था पडली आजारी” असे म्हणत त्यांनी देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवले. तसेच, तेल कंपन्यांचा नफा आणि जनतेचा तोटा यातील तफावत मांडताना ते म्हणाले की, “तेल कंपन्यांनी भरल्या तुंबड्या, तोटा होताच मागा आमच्या दमड्या.”
बेरोजगारी आणि जाचक धोरणे
शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांनाही कोल्हे यांनी कवितेत स्थान दिले आहे. “शेतकरी झाला कर्जबाजारी, बेरोजगार तरुणाई दारोदारी” या ओळींतून त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील समस्यांचा उल्लेख केला. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली होणारी नोकरकपात आणि गेल्या 12 वर्षांतील सरकारच्या ‘मनमानी कारभारावर’ त्यांनी टीका केली. निवडणुकीपूर्वी दिली जाणारी आश्वासने आणि त्यानंतर येणारे आर्थिक संकट यावर त्यांनी उपरोधिक भाषेत टीका केली.
डॉ. अमोल कोल्हे यांनी सादर केलेली विडंबनात्मक कविता जशीच्या तशी :
दाढीवाला बाबा वदला, चला पटापट सवयी बदला
दाढीवाला बाबा वदला, चला पटापट सवयी बदला…
पेट्रोल-डिझेलचा झाला तुटवडा,
सोन्याचा तर तुम्ही मोहच सोडा
नकोच आता परदेशवारी,
अर्थव्यवस्था पडली आजारी
शेतकरी झाला कर्जबाजारी,
बेरोजगार तरुणाई दारोदारी
तेल कंपन्यांनी भरल्या तुंबड्या,
तोटा होताच मागा आमच्या दमड्या
अमेरिकेच्या हाती दिल्या नाड्या,
आम्हाला मात्र देशभक्तीच्या पुड्या
धर्माचा झेंडा अन् जातीचा दांडा,
सत्तेसाठी सुरू रोज नवा फंडा
निवडणुकांआधी रेवड्यांचा महापूर,
नंतर लगेच आर्थिक संकटाचा सूर
‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे नोकऱ्यांची कपात,
कुणी असेल जात्यात, कुणी असेल सुपात
12 वर्षांचा मनमानी कारभार,
आता जनतेने का सोसावा त्याचा भार?
आठवा… आठवा… ‘बस हुई महागाई की मार’,
आता देशभक्तीच्या नावाखाली तोंड दाबून बुक्क्यांचा मार
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
जय शिवराय!
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.