Ajit Pawar in Pimpari Chinchwad : पिंपरी-चिंचवड येथे आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी बोलताना त्यांनी अत्यंत मिश्किलपणे आपल्या यशाचे श्रेय शरद पवारांना दिले. “माझं सगळं काही काकाच्या पुण्याईनेच लय बरं चाललंय,” असे विधान करत त्यांनी उपस्थितांमध्ये एकच हस पिकवले. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, काका-पुतण्यांमधील संबंधांबाबत पुन्हा एकदा तर्कवितर्क लढवले जात आहेत.
‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ एकत्र येण्याचे संकेत?
याच कार्यक्रमात अजित पवारांनी एक सूचक विधान करत सर्वांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट म्हणजेच ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ पुन्हा एकत्र येत असल्याचे संकेत त्यांनी दिले. “तुतारी आणि घड्याळ आता एकत्र येत आहेत,” असे म्हणत त्यांनी दोन्ही गटांच्या मनोमिलनाबाबत सकारात्मक टिप्पणी केली. त्यांच्या या विधानामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, मला आयुष्यात दुसरी कोणतीही मोठी अपेक्षा नाही आणि काकांच्या आशीर्वादामुळे माझे आयुष्य सुकर झाले आहे. “मी गळ्याची शपथ घेऊन सांगतो की मी खोटे बोलत नाही, त्यामुळे माझी काळजी करू नका,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या आत्मविश्वासी भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला, तसेच त्यांनी आपल्या विरोधकांनाही या विधानातून अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
राजकीय वळणावर ‘पुण्याई’ची चर्चा
राजकारणात नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटातील अंतर या विधानामुळे कमी होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अजित पवारांनी जाणीवपूर्वक ‘काका’ असा उल्लेख करून भावनिक साद घातल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा पक्षांतर्गत समीकरणांमुळे ही “पुण्याई” आणि “एकत्रीकरण” राज्याच्या राजकारणात कोणत्या दिशेला वळण घेते, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
येत्या 15 जानेवारी 2026 रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी मतदान होणार असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. 32 प्रभागांमधील 128 जागांसाठी होणाऱ्या या लढतीत तब्बल 692 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, राज्यातील ‘महायुती’ आणि ‘महाविकास आघाडी’ची समीकरणे बाजूला सारून स्थानिक पातळीवर नव्या आघाड्या पाहायला मिळत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेसाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट (तुतारी) यांनी ‘पुणे पॅटर्न’प्रमाणे एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्यांची ही युती कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे प्रामुख्याने भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना रंगणार असून, भाजपने 125 तर अजित पवार गटाने 118 उमेदवार मैदानात उतरवून जोरदार कंबर कसली आहे.
हेही वाचा – BJP – MIM Alliance: सत्तेसाठी भाजपचा एमआयएमशी घरोबा? राजकारणातील सर्वात ‘अजब’ युती, कुठं घडलं हे?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.