इस्कॉन खारघरचे संस्थापक विश्वस्त आणि अध्यक्ष डॉ. सूरदासजी प्रभू यांनी अजित पवार यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघात निधन झाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर अजित पवार यांचं विमान उतरत असतानाच विमान थेट जमिनीवर कोसळलं, या घटनेमध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातानंतर आता इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदास यांनी मोठा दावा केला आहे.
अजित पवारांना मागील आषाढी एकादशीला इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ भेट दिला होता. हा ग्रंथ नक्की वाचा, असं त्यांनी अजित पवारांना आवर्जून सांगितलं होतं. मात्र, अजित पवारांनी हा ग्रंथ वाचला नसल्याचा सूरदासजींचा विश्वास आहे. ‘श्रीमद्भागवत’ वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, असा त्यांचा विश्वास आहे.
अजित पवारांसोबत जे काही घडलं, ती अत्यंत दुर्दैवी घटना असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये अजून देखील शोकाचं वातावरण असताना हे वक्तव्य समोर आलं आहे.दरम्यान सूरदास यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावर आता राजकीय आणि सामाजिक स्तरातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.