Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात राजकीय वादाला हिंसक वळण! भाजप पदाधिकाऱ्यावर तब्बल 100 जणांचा हल्ला; परिसरात तणावाचं वातावरण

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाने गंभीर वळण घेतलं.

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात राजकीय वादाला हिंसक वळण! भाजप पदाधिकाऱ्यावर तब्बल 100 जणांचा हल्ला; परिसरात तणावाचं वातावरण

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाने गंभीर वळण घेतलं. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषी शेटे यांच्यावर मोठ्या जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी शेटे यांनी नगरपंचायतीकडे केली होती. त्यानंतर नगरपंचायतीचे अधिकारी आणि पोलिसांचं पथक कारवाईसाठी संबंधित परिसरात पोहोचलं. यावेळी स्थानिक व्यावसायिक आणि पथकामध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास गणपती मंदिर परिसरातून जात असताना शेटे यांना मोठ्या जमावाने घेरल्याची माहिती आहे. जमावातील काही जणांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर शेटे यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नगरपंचायतीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांनाही जमावाच्या विरोधाचा सामना करावा लागला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे शेटे यांची जमावातून सुटका करण्यात आली आणि पुढील अनर्थ टळला.

या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या जमावाविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत सात संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर नेवासा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अफवा पसरवू नयेत आणि नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अतिक्रमणाच्या कारवाईवरून सुरू झालेला हा वाद आता थेट हिंसक हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चेला उधाण आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number