आखाती देशांतील संघर्षामुळे देशातील इंधन तुटवड्याची झळ शेतकऱ्याला बसू लागली असून, डिझेल अभावी ग्रामीण भागात शेतीची कामे रखडल्याचे चित्र आहे. सध्या शेतात नांगरणीची कामे सुरू असून यासाठी ट्रॅक्टरला डिझेलची तीव्र आवश्यकता भासत आहे. मात्र, डिझेल तुटवड्यामुळे कामे खोळंबल्याने शासनाने शेती कामांसाठी इंधनाचा वेगळा साठा राखून ठेवावा अशी मागणी शेतकरी राजाराम कार्ले यांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर डिझेल येताच डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील पेट्रोल पंपावर पाहायला मिळत आहे. डिझेल मिळत नसल्याने निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याचा फटका लोणार तालुक्यात वाहनधारकांना बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्याने मोठी अडचण होत होती. दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर पेट्रोल पंपावर डिझेल येताच नागरिकांची डिझेल घेण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती.
राज्यात इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून अनेक पेट्रोल पंप ड्राय झाले. डिझेल भेटत नसल्याने शेतकऱ्यांचे खरिपाच्या मशागती खोळंबल्या आहे. मराठवाड्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी डिझेल घेण्यासाठी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पेट्रोल पंपावर गर्दी करीत आहे. अक्षरश : कॅन आणि ड्रमच्या मोठमोठ्या रांगा लागल्या असून प्रत्येक शेतकऱ्याला थोडेथोडे डीझेल या पंपावरून दिले जात आहे. हे डिझेल घेण्यासाठी शेतकरी सकाळपासून विना अन्न पाण्याचे पंपावर गर्दी करीत आहे.
सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांची प्रचंड झुंबड उडाली आहे. जिल्ह्यात इंधन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याने नागरिक आणि विशेषतः शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. सध्या खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, ट्रॅक्टर आणि इतर शेती अवजारांसाठी डिझेल मिळत नसल्याने. डिझेल मिळवण्यासाठी ग्रामीण भागात शेतकरी हातात कॅन घेऊन पेट्रोल पंपांवर तासंतास रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंधनाचा तुटवडा आणि त्यातच वाढलेले दर यामुळे शेतीची मशागतीची कामे पूर्णपणे रखडली असून शेतकरी पुरते वैतागले आहेत.
धुळे शहरासह जिल्ह्यात काही प्रमाणात इंधनाचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली असून विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नसल्याचे फलक लागण्यास सुरुवात झाली आहे, यामुळे ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल शिल्लक आहे त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी होत असल्याने इंधनाचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.