अंतरवाली – सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत धडक देण्याचे संकेत दिले आहेत. सध्या मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत आंदोलन उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, मराठा बांधवांशी बोलताना जरांगेंनी पुन्हा एकदा मुंबईत कूच करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी येत्या 12 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईत पोहोचण्यात आंदोलनकर्त्यांना सांगितले आहे. तर पुढे दोन दिवसांत म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा सण सुरू होत आहे. गेल्यावर्षीदेखील गणेशोत्सवाच्या सणालाच मनोज जरांगेंनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्याप्रमाणे यंदाही मराठ्यांचं आंदोलन गणेशोत्सव सणाच्या आगमनापूर्वी होताना दिसत आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, राज्यातील सर्व मराठा समाजाने हळूहळू मुंबईच्या दिशेने कूच करावे. या आंदोलनासाठी मुंबईत राहणाऱ्या नातेवाईक आणि पाहुण्यांचा शोध घेऊन राहण्याची सोय करावी. मुंबईत कमीत कमी एक-दोन लाख मराठ्यांची घरे आहेत. त्यामुळे पुढील सहा दिवसांत सर्वांनी मुंबईत राहण्यासाठी आपले पाहुणे शोधून ठेवावेत. मात्र, सध्या कोणीही मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगला आणि आझाद मैदानाकडे जाऊ नका. संपूर्ण मुंबईत जिथे जागा मिळेल तिथे राहा, पण या दोन महत्त्वाच्या ठिकाणी सध्या जाणे टाळा, असे जरांगे पाटलांनी म्हटले.