Abu Azmi On Loudspeakers: सध्या राज्यभरात नवरात्री उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे. अशातच समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आसिम आझमी यांनी लाऊडस्पीकर वापरासंबंधी एक वेगळी मागणी केली आहे. आझमींच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रकारे इतर सण आणि नवरात्राच्या सणांमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यास सवलत दिली जाते, त्याचप्रमाणे अजानसाठीही लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली जावी.
आझमी यांनी म्हटलं आहे की, 'देशभरातील सर्व सणांमध्ये रात्री उशिरापर्यंत उत्सव साजरे केले जातात, मात्र लाऊडस्पीकरसाठी रात्री 10 वाजेची मर्यादा लागू असल्यामुळे अजानसाठी मशिदींमध्ये आवाज वाढवणे शक्य होत नाही. त्याचबरोबर, मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यासाठी डेसिबल मर्यादा देखील खूप कमी असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर आझमींनी सरकारकडे मागणी केली की, धार्मिक सण आणि नमाज यांसाठी स्पष्ट धोरण तयार केले जावे, जेणेकरून दुहेरी मानके टाळता येतील आणि सर्व धर्मीयांचा आदर राखला जाईल.'
दरम्यान, आझमी यांनी म्हटलं आहे की, नमाजसाठी अजान दोन ते पाच मिनिटांची असते, तरीही कमी डेसिबलमुळे लाऊडस्पीकर वापरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सरकारने मशिदींमध्ये लाऊडस्पीकर बसवण्यास परवानगी द्यावी. आझमी यांचा हा प्रस्ताव नवरात्री उत्सवाच्या दरम्यान आला आहे. त्यामुळे आता समाजात लाऊडस्पीकर वापरासंबंधीच्या नियमांवर पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.
तथापी, आझमी यांनी स्पष्ट केले की, मुस्लिम समाजाला नवरात्र आणि इतर सणांमध्ये लाऊडस्पीकर वापरण्याबाबत कोणताही आक्षेप नाही, मात्र सरकारने सर्व सण आणि नमाज यासाठी एकसमान धोरण तयार करून दुहेरी मानके स्वीकारणे टाळावे. आझमींच्या या मागणीनंतर लाऊडस्पीकरसंबंधी नियमांमध्ये बदल करण्याबाबत प्रशासनाकडून विचार केला जाईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.