Abhijeet Dipke after Dharmendra Pradhan's Resignation: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी जंतरमंतरवरून आंदोलकांना संबोधित करताना अत्यंत संयमी पण परखड प्रतिक्रिया दिली. 'धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला, तरी त्यासाठी मला कोणीही हिरो बनवू नका, ही चूक अजिबात करू नका,' असे आवाहन त्यांनी केले. 'एकाच व्यक्तीला हिरो बनवण्याच्या आणि त्याला मूळ मुद्दे, संस्था तसेच संविधानापेक्षाही मोठे मानण्याच्या सवयीमुळेच देशाचे मोठे वाटोळे झाले आहे. मोदी सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असा समज होता, पण जर आपण झुकलो नाही तर भल्याभल्यांचे राजीनामे करून घेऊ शकतो हे आम्ही दाखवून दिले,' असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
'झुरळ एकदा शिरले की बाहेर जात नाही'; उर्वरित 2 मागण्यांवर दीपके ठाम
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन मागे घेण्यास दीपके यांनी स्पष्ट नकार दिला आहे. 'आम्ही कॉकरोच आहोत, एकदा आत शिरलो की सहजासहजी बाहेर पडत नाही,' असे म्हणत त्यांनी पोलिसांना इशारा दिला. दिल्ली पोलिसांच्या ज्या अधिकाऱ्यांनी अमित शाह आणि पंतप्रधानांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे; कारण एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेणाऱ्या आंदोलकांसाठी पोलीस अधिकारी फार मोठे नाहीत, असे ते म्हणाले. यासोबतच, नीट प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि 20 जुलैनंतर विद्यार्थ्यांवर नोंदवलेले सर्व खटले मागे घ्यावेत, या 2 मुख्य मागण्या मान्य झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही, असे त्यांनी ठणकावले.
मोहन भागवत यांच्या विधानानंतर अवघ्या 4 तासांत राजीनाम्याची घडामोडी
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामागे संघाच्या भूमिकेचीही मोठी चर्चा रंगली आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी सकाळी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, 'आम्ही सत्तेच्या जोरावर सर्वांचे मालक बनू हे घडू शकत नाही. आजची नवीन पिढी खूप प्रश्न विचारते, त्यामुळे त्यांना केवळ आदेश न देता त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे.' भागवत यांनी सत्तेच्या मग्रुरीवर भाष्य केल्यानंतर अवघ्या 4 तासांच्या आत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
NTA वर मोठी कुऱ्हाड; 47 अधिकारी बडतर्फ, 2 सचिव बदलले
दुसरीकडे, नीट पेपरफुटी प्रकरणी प्रशासकीय पातळीवर अत्यंत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) 47 अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने बडतर्फ करण्यात आले असून त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी गुरुवारीच सरकारने शिक्षण मंत्रालयाच्या 2 वरिष्ठ सचिवांची हकालपट्टी केली होती. परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी आउटसोर्सिंग यंत्रणेत पूर्णपणे बदल केले जाणार असून संस्थेमध्ये अत्याधुनिक तांत्रिक सुधारणा लागू केल्या जात आहेत.
सुरक्षित परीक्षांसाठी पारदर्शक प्रणाली आणि नवीन नियुक्त्या
भविष्यात प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एका विशेष चाचणी प्रणालीवर काम सुरू करण्यात आले आहे. NTA मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रतिभा सेतू पोर्टलच्या माध्यमातून 4 वरिष्ठ महाव्यवस्थापक आणि 16 तरुण व्यावसायिकांची (Young Professionals) नियुक्ती केली जाणार आहे. परीक्षा पद्धतीत पूर्ण सुधारणा करूनच पुढील सर्व प्रक्रिया राबवली जाईल, असा विश्वास प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.