नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या मालेगावच्या ग्रामसभेत एका धाडसी तरुणीने रस्ते, शौचालये, पाणी, सॅनिटरी नॅपकिन्स, सीसीटीव्ही इत्यादींसारख्या मुद्द्यांवरून गावच्या नेत्यांना आणि प्रशासनाला निर्भयपणे प्रश्न विचारत घाम फोडला आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेगाव ग्रामसभेत तरुणीने भर महासभेत सरपंचास गावातील समस्यांवरून धारेवर धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहिणी राऊत या तरुणीने रस्ते, शौचालय आणि पाण्याच्या प्रश्नांवर जाब विचारत ग्रामसभेत गावपुढारी आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सॅनिटरी नॅपकिन आणि गावातील मूलभूत सुविधांचा मुद्दा उपस्थित करत तिने भर सभेत सरपंचांना घाम फोडल्याचे पाहायला मिळाले. तसेच गावातील सुरक्षेसाठी CCTV बसवण्याची देखील मागणी केली. यावेळी “कुणाकुणाला अटक करून कितीजणांचा आवाज दाबणार?” असा थेट प्रश्न रोहिणी राऊतने गावच्या सरपंचांना विचारला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यावेळी व्हिडिओमध्ये तरुणी म्हणाली की, “तुम्हाला आम्हाला फळ्यावर लिहून दाखवलं का? असं करायचं आहे की तसं करायचं आहे. गावामध्ये सार्वजनिक टॉयलेट बाथरूम होणारे की सार्वजनिक रोड होणारे… तुम्ही कधी सांगितलं का? गावात सीसीटीव्ही होणारे? गावात आहेच काय सुविधा? गावामध्ये सुविधा आहेच काय? फक्त लाईट लावून ठेवलीये, सीसीटीव्ही नाही, फिल्टरचं पाणी नाही. कितीतरी लोकांना मुतखड्याचा त्रास आहे. बाथरूममध्ये पण संडासचं पाणी येतं, गावातात सुरू झालंय आता… यांनी सॅनेटरी पॅडचं डिस्पोजिबल मशीन आणून ठेवलंय आणि ते ग्रामपंचायतीमध्ये आणून ठेवलंय.”
“महिला तिथं जाऊन डिस्पोज करतील का? किशोरवयीन मुली तिथं जाऊन पॅड डिस्पोज करतील का? ग्रामपंचायतीला लॉक लावलेलं असतंय मग डिस्पोज कोण करेल? या सगळ्या गोष्टींची उत्तर आम्हाला द्या, असं तरुणी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. त्यावर सरपंचाने मशिन खराब झालंय, असं उत्तर दिलं. या उत्तरावर तरुणी भडकली. मशीन आणलं होतं, कुणी वापरलं नाही तर खराब कसं झालं? मशीन आणली ही गोष्ट सांगितली देखील का नाही?” असा खडा सवाल या तरुणीने ग्रामसभेसमोर सरपंचांना विचारला. तरुणीचं धाडस पाहून अनेकांनी तिला साथ दिली.
ग्रामसभा ही गावपातळीवरील लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार मानली जाते. ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांना स्थानिक प्रशासनाच्या कामकाजात थेट सहभाग घेता येतो, तसेच गावाच्या विकासाशी संबंधित प्रश्न उपस्थित करून प्रशासनाकडून जाबही विचारता येतो. अशातच नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेगाव ग्रामसभेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये रोहिणी राऊत या तरुणीने गावातील विविध समस्यांवरून गावपुढारी आणि प्रशासनाला थेट सवाल केले. गावातील मूलभूत सुविधा, विकासकामे आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी संबंधितांकडून उत्तरांची मागणी केली. ग्रामसभेत तरुणीने आक्रमकपणे मांडलेल्या या भूमिकेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
रोहिणी राऊत! नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेगावच्या ग्रामसभेत रस्ते, शौचालय, पाणी, सॅनिटरी नॅपकिन, cctv इत्यादी मुद्द्यांवरून गावपुढारी व प्रशासनाला जाब विचारणारी धाडसी पोरगी. कुणाकुणाला अटक करून कितीजणांचा आवाज दाबणार? पुणे असो की दिंडोरीचा आदिवासी पाडा. लोक बोलू लागलेत. pic.twitter.com/bwGubpIeLD — Mahadev Balgude (@Mahadev_Balgude) September 5, 2026