PMC Election 2026: पाषाणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बंड; प्रमोद निम्हणांचे तिकीट कापल्याने गावकरी रस्त्यावर

पाषाण प्रभागातून इच्छुक असलेले प्रमोद निम्हण यांना डच्चू देऊन पक्षाने बाबुराव चांदेरे यांना मैदानात उतरवल्याने स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
PMC Election 2026: पाषाणमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बंड; प्रमोद निम्हणांचे तिकीट कापल्याने गावकरी रस्त्यावर

PMC Election 2026:  पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठी ठिणगी पडली आहे. पाषाण प्रभागातून इच्छुक असलेले प्रमोद निम्हण यांना डच्चू देऊन पक्षाने बाबुराव चांदेरे यांना मैदानात उतरवल्याने स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून 1 जानेवारी 2026 रोजी पाषाण परिसरात कडकडीत बंद पाळून स्थानिकांनी आपली नाराजी व्यक्त केली.

नेमकं काय आहे प्रकरण ?

प्रमोद निम्हण यांनी या निवडणुकीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी पक्षाने जुन्या जाणत्या बाबुराव चांदेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामुळे निम्हण समर्थकांचा संताप अनावर झाला. स्थानिक जनतेचा कौल डावलला गेला, असा आरोप करत ग्रामस्थांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा बाजूला ठेवून दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवून निषेध नोंदवला.

हेही वाचा – Pooja More Video : पहलगामसंबंधीत 'ते' वक्तव्य भोवलं; पूजा मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला, ओक्साबोक्सी रडतं सांगितला घडलेला प्रकार

जनतेचा आवाज दाबता येणार नाही – प्रमोद निम्हण

उमेदवारी नाकारल्यानंतर प्रमोद निम्हण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, 'हा बंद म्हणजे केवळ आंदोलन नसून अन्यायाविरोधात पेटलेली लोकशक्ती आहे. जनतेचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. पाषाणच्या नागरिकांनी शांततेच्या मार्गाने जी एकजूट दाखवली, त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. सत्यासाठीची ही लढाई आता थांबणार नाही.' 

हेही वाचा – Uddhav Kamble : 'मी AB फॉर्म खाल्ला…, भावनेच्या भरात तो…'; शिंदेंच्या त्या उमेदवारानं सांगितलं नेमकं काय घडलं?

दरम्यान, पाषाणमधील या उत्स्फूर्त बंदमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयारामांना संधी दिल्याने आणि निष्ठावंतांना डावलल्याने अनेक प्रभागांत नाराजी पसरली आहे. आता पाषाणमधील हा असंतोष शमवण्यासाठी आणि बाबुराव चांदेरे यांचा मार्ग सुकर करण्यासाठी अजित पवार कोणती रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version