विजय चिडे, प्रतिनिधी
बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 19 तर त्यांच्या मुंबई दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी काल, मंगळवारी अंतरवाली सराटीतून मुंबई दौऱ्याला सुरुवात केली. त्यांनी काल रात्री बीडच्या पाटोदा या ठिकाणी मुक्काम केला. आज, बुधवारी अहिल्यानगरच्या श्रीगोंदा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असणार आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांची मुंबईतील आझाद मैदानावर परवानगी नाकारली असतानाही त्यांची मुंबईच्या दिशेने कुच सुरू आहे. सरकार आज जरांगे पाटील यांच्याशी काही चर्चा करते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले असून यांचा रात्रीचा मुक्काम पाटोदा येथे होता. रात्री साधारणता दीड वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील हे पाटोदा येथे दाखल झाले. एवढा उशीर होऊनदेखील हजारो मराठा समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील –
आपल्यासाठी समाज फार महत्वाचा आहे. आपल्यासाठी कोणी नाही हे लक्षात ठेवा. आपला समाज आपल्याला मोठा करायचा आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे. लढायचे शिका. सगळ्याचे लेकरं एसीमध्ये बसली आहेत. मी चांगल्या चांगल्याला जेरीस आणतो. मी घाबरलो नाही. खचलो नाही. माझ्या समाजाच्या लेकरा-बाळांसाठी लढताना शरीर थकलयं. तुमच्यासाठी मी सरकारला अंगावर घेतले आहे. आपण कधीच हतबल होऊ शकत नाही. सरकारला वाटते मी त्यांना शरण यावे, मागणी सोडून देऊ?, सरकारपेक्षा माझा बाप मोठा आहे. समाज…माझा समाज कोणतेही सरकार पाडू शकतो, दुसरं सरकार आणू शकतो. मी मरेन पण तुम्हाला मान खाली घालू देणार नाही. आजचा प्रवास फार मोठा झाला. मी समाजाला सांगितले होते, तुम्ही येऊ नका. मला एकट्याला जायचे आहे. त्यांच्यात किती दम आहे ते. माझे ऐकायचे असेल तर सांगतो. तुमच्या लेकराशिवाय एक घासही मी खात नाही. गेली चोवीस वर्ष मी हे काम करत आहे. दोन वेळेस मुंबईला गेलो. आज उपोषणाचा अठरावा दिवस आहे. सलाईन घेतले म्हणून बरे वाटले पण बारा तारखेला सलाईन सोडले, तेव्हापासून पुन्हा त्रास होत आहे.