Solapur Politics : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा उडत असतानाच खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाला महाराष्ट्रात भीषण धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि सोलापूरचे वजनदार नेते फारुख शाब्दि यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एमआयएममध्ये इम्तियाज जलील यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जाणारे शाब्दि यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर साथ सोडल्याने पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
पक्षांतर्गत गटबाजीचा फटका?
फारुख शाब्दि यांच्याकडे सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष आणि प्रदेश कार्याध्यक्ष अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा झुंजार लढत देत दुसरे स्थान पटकावले होते. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा – Amravati Municipal Election : अमरावतीत महायुतीला तडा ! जागावाटपावरून भाजप-शिवसेना आमनेसामने
एकीकडे 'इनकमिंग', दुसरीकडे 'आऊटगोइंग'
विशेष म्हणजे, शाब्दि यांनी राजीनामा देण्यापूर्वी काही तास आधीच काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील प्रभाग 16 च्या अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी शाब्दि यांच्याच उपस्थितीत एमआयएममध्ये प्रवेश केला. मात्र, या पक्षप्रवेशाच्या काही वेळातच स्वतः शाब्दि यांनी पक्षाला 'रामराम' ठोकल्याने एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा – BMC Election 2026 : मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदेंचा भाचा आशिष माने अजित पवारांच्या गोटात
सोलापूरच्या राजकारणात उलथापालथ
सोलापूर महापालिकेत एमआयएमची मोठी ताकद आहे, परंतु मुख्य चेहऱ्यानेच पाठ फिरवल्याने आता महापालिका निवडणुकीत पक्षाची गणिते बिघडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महायुती आणि भाजपमध्येही जोरदार 'इनकमिंग' सुरू असून, नवीन नेत्यांच्या प्रवेशामुळे निष्ठावंतांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.