Nanded Crime: मुदखेड तालुक्यातील जवळा गावातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लखे कुटुंबातील चारही सदस्यांनी आपले जीवन संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन तरुण मुलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आपल जीवन संपवल्यानंतर त्यांच्या विरहाने किंवा अन्य कारणाने आई-वडिलांनीही घरातच गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जवळा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश होनाजी लखे (51) आणि राधाबाई रमेश लखे (44) हे दांपत्य आपल्या दोन मुलांसह जवळा येथे राहत होते. गुरुवारी सकाळी 22 वर्षीय बजरंग रमेश लखे आणि 25 वर्षीय उमेश रमेश लखे या दोन सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. मुलांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर, जेव्हा गावकरी आणि पोलीस त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा घरातील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. आई राधाबाई आणि वडील रमेश यांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आढळले.
संपूर्ण कुटुंब संपले –
प्राप्त माहितीनुसार, लखे कुटुंबात एकूण चारच सदस्य होते, या घटनेमुळे संपूर्ण वंश संपला आहे. मृत उमेश लखे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष होता आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचा. प्राथमिक तपासात हे पाऊल आर्थिक अडचणींमुळे उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – ACB Action : पगार 1 लाख, संपत्ती 100 कोटी! तेलंगणा उपपरिवहन आयुक्ताच्या 'छुप्या साम्राज्या'चा पर्दाफाश
पोलीस तपास आणि पुढील कार्यवाही
मुदखेड आणि नांदेड ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांच्या जबाबांनंतरच आत्महत्येचे ठोस कारण स्पष्ट होईल. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.