मुंबई, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले आहेत.
एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेल्या चर्चेतून बाहेर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर स्वतःच्या वाहनात बसून वेगाने निघून गेले. जाण्याआधी प्रसारमाध्यमांनी त्यांना चर्चेत काय झाले याविषयी प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना ‘माझा चेहराच सगळं सांगतोय’ असे सूचक वक्तव्य करून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर निघून गेले.
याआधी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने मविआकडे २६ ते २७ जागांची मागणी केली होती. किमान तीन ते पाच मुसलमानांना उमेदवारी द्यावी अशीही मागणी वंचितने मविआकडे केली होती. या मागण्या मान्य झाल्या नसल्याचे सूत्रांकडून समजते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.