Khandeavami 2025 : आश्विन शुक्ल पक्षातील नवमी तिथीला 'आयुध नवमी' किंवा 'खंडेनवमी' असे म्हटले जाते. प्रामुख्याने या दिवशी 'शस्त्र पूजन' केले जाते. युद्धात विजय प्राप्त केल्यानंतर शस्त्रांचे आदरयुक्त पूजन करण्याची प्रथा प्राचीन काळापासून भारतात आहे. 'खंडेनवमी' हा मराठी शब्द असून, याचा संबंध तलवार सदृश्य 'खांडा' नावाच्या हत्याराच्या पूजनाशी आहे.
प्रादेशिक विविधता आणि पौराणिक कथा
संपूर्ण भारतात खंडेनवमीला एकाच प्रकारे पूजा केली जात नाही. उत्तर भारतामध्ये या दिवशी सरस्वती देवीचे पूजन होते, तर दख्खन (महाराष्ट्र) आणि दक्षिण भारतात शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. तर, दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांकडून ते शाळेत लिहिण्यासाठी वापरत असलेल्या पाटीचे आणि वहीचे पूजन करून घेतले जाते. तसेच, देशाच्या अनेक भागांमध्ये दसऱ्याच्या दिवशीच सरस्वतीपूजन आणि शस्त्रपूजन असे दोन्ही केले जाते.
दुर्गा आणि महिषासूर यांचं युद्ध : एका कथेनुसार, महिषासुर आणि दुर्गा माता यांच्यात नऊ दिवस नऊ रात्री युद्ध झाले. महिषासुराचा वध झाल्यावर देवीने आपली शस्त्रास्त्रे स्वच्छ करून त्यांचे विधिवत पूजन केले. युद्धात ज्या शस्त्रांच्या जोरावर विजय मिळवला, त्या शस्त्रांचा आदर करण्यासाठी हा विधी सुरू झाला.
पांडवांचा अज्ञातवास: महाभारतातील उल्लेखानुसार, पांडवांना अज्ञातवास भोगत असताना अर्जुनाने आपली सर्व शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर याच दिवशी अर्जुनाने ती शस्त्रे परत मिळवली होती.
हेही वाचा – Dussehra 2025 : दसऱ्याला करा धनप्राप्तीचे 'हे' उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न आणि होईल सोन्याची लयलूट!
सामाजिक, धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व
पूर्वीच्या राजघराण्यांमध्ये आयुध नवमीला विशेष महत्त्व होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सीमोल्लंघन हा विधी साजरा केला जात असे आणि विजयादशमीला (दसऱ्याला) सीमा, राजवट आणि सत्ता वाढवण्यासाठी युद्ध किंवा आक्रमणे सुरू केली जात असत. हा राजघराण्याचा कुळाचार मानले जात असे. यामुळे या दिवसाला धार्मिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व आहे.
शास्त्रीय दृष्टिकोन: शास्त्रीयदृष्ट्या पाहिले तर, पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याची ही प्रक्रिया असते. पावसाळ्यामध्ये शस्त्रास्त्रांना गंज चढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे खंडेनवमीपूर्वी सर्व शस्त्रास्त्रे 'शिकल' (स्वच्छ करणे, गंज काढणे, धार करणे) करण्यासाठी दिली जात. शस्त्रास्त्रे पूजनानंतरच युद्ध किंवा आक्रमणे सुरू केली जात असत.
पूजेच्या स्वरूपातील बदल
कालांतराने शस्त्र पूजनाचे महत्त्व सर्वच वर्गांतील लोकांनी स्वीकारले. शेतकरी शेतीच्या अवजारांचे पूजन करू लागले. तसेच, सर्व लोक आपापल्या कामांसाठी लागणाऱ्या आयुधांचे किंवा साहित्यांचे पूजन करू लागले. घरातील विळ्या, चाकू, माप, मुसळ अशा वस्तूही पूजनात आल्या. सध्या या विधीचे स्वरूप खूप बदलले आहे. जी वस्तू आपल्यासाठी प्रगतीचे द्योतक आहे किंवा ज्या वस्तूच्या आधारावर आपली प्रगती होते, अशा सर्व वस्तूंचे पूजन करण्याची प्रथा खंडेनवमीच्या निमित्ताने रूढ झाली आहे.
(Disclaimer : ही बातमी सामान्य माहिती आणि लोकांमध्ये रुजलेल्या श्रद्धेवर आधारित आहे. यातून जय महाराष्ट्र कसलाही दावा करत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.