हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेशमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसवर डोंगरकडा कोसळला असून, या दरडीखाली जवळपास ४० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. तर, या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृतदेह हाती लागले असून, दहा जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. याचबरोबर बचावकार्य देखील युद्धपातळीवर सुरू आहे.
चौरा आणि किन्नूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये एक डोंगर कडाच तुटून बसवर पडल्याने संपूर्ण बस या ढिगाऱ्याखाली सापडली. ही बस किन्नूरमधून हरिद्वारकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग पाचवर झालेली ही दुर्घटना छील जंगलाच्या परिसरात घडली आहे. या दुर्घटनेमुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.
तसेच,स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या दरडीखाली बस बरोबर काही खासगी वाहनेही गाडली गेल्याची शक्यता आहे. खासगी वाहनांमधील काही लोक मदतीसाठी ओरडत होते असं स्थानिकांनी म्हटलं आहे.