मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदा सहा फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी 350 हून अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदाही लहान मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये केले जाणार असून, जलप्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने पालिकेने ही सुविधा उपलब्ध केली आहे. मुंबईकरांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता कृत्रिम तलावांची संख्या दरवर्षी वाढवण्यात आली असून, 2024 मधील 204 आणि 2025 मधील 298 तलावांच्या तुलनेत यंदा 352 तलाव उभारले आहेत. यंदा सर्वाधिक 34 कृत्रिम तलाव 'के पश्चिम' विभागात तयार करण्यात आले. जुहू चौपाटी, अंधेरी स्पोट्स कॉम्प्लेक्स, वर्सोवा जेट्टी आणि लोखंडवाला कॉम्प्लेक्स यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. त्या खालोखाल डी विभागात 28, ई 23 आणि जी उत्तर विभागात 22 तलाव उभारले आहेत. सर्वात कमी म्हणजेच 3 तलाव बी विभागात आहेत. भाविकांना या तलावांची माहिती सहज मिळावी, म्हणून महापालिकेने क्यूआर कोड विकसित केला असून पालिकेच्या संकेतस्थळावरही विभागनिहाय यादी उपलब्ध केली आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने गणेशोत्सवाच्या तयारीला वेग दिला असून, अधिकाऱ्यांनी मुंबईतील विसर्जन स्थळांवरील नियोजनाचा आढावा घेतला. एका अधिकृत निवेदनानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी रविवारी मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरांमधील गणेश मूर्तींचे आगमन व विसर्जन यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विविध विसर्जन स्थळांची पाहणी केली. महानगरपालिका प्रशासनाने उत्सवादरम्यान भाविकांना आवश्यक सेवा आणि सुविधा पुरवण्यासाठी योग्य ती व्यवस्था केली आहे. डॉ. ढाकणे यांनी चौपाटी (स्वराज्यभूमी) आणि दादर येथील तयारीची पाहणी केली. त्यांनी भाविक आणि विसर्जन प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिलेल्या महानगरपालिकेच्या सुविधा व सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. चौपाटीवर निरीक्षण मनोरे (वॉच टॉवर्स), तराफे, निर्माल्य संकलन पात्रे आणि इतर सुविधा पूर्णपणे कार्यरत राहतील याची खात्री करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या मिरवणुका कोणत्याही अडथळ्याविना सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी बसवण्यात आलेल्या स्टीलच्या प्लेट्सचीही त्यांनी पाहणी केली. डॉ. ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना मूर्ती विसर्जनादरम्यान विशेष काळजी घेण्याचे आणि ही प्रक्रिया सुरक्षित व सुरळीतपणे पार पडेल, याची खात्री करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, महापालिकेद्वारे मूर्ती विसर्जनासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी मोफत क्रेन सेवा पुरवली जाणार आहे. डॉ. ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना या सुविधेबाबत माहिती द्यावी आणि विसर्जन प्रक्रियेदरम्यान त्याचा वापर करण्यास त्यांना प्रोत्साहित करावे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अत्यावश्यक नागरी सेवा पुरवण्यासाठी, विसर्जन सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी आणि पर्यावरणपूरक विसर्जन पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आणि उत्सवाच्या काळात भाविकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.