केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे माजी सरपंच पोपटराव पवार आणि बीजमाता राहीबाई पोपरे यांनाही पद्मश्रीने गौरव करण्यात आला आहे. पोपटराव पवार यांना समाज कार्य आणि राहीबाई पोपरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने राहीबाई पोरे यांच्या कामाची दखल घेतली आहे. राहीबाई पोरे यांना बीजमाता म्हणून ओळखले जाते.
राहीबाई यांनी ग्रामीण भागात बियाणांची बँक सुरु केली आहे. बँकेद्वारे राहीबाई पोरे यांनी अनेक बियाणांच्या वाणाचे जतन केले आहे.
दरम्यान याआधी राहीबाई यांच्या कामाची दखल घेत त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं होतं. त्यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरवलं होतं.
पोपटराव पवार यांनी आदर्श गाव कसं असावं, याचं उदाहरण उभ्या महाराष्ट्राला दिलं. पोपटराव पवार यांनी अहमदनगरमधील हिवरे बाजार या गावाचा कायापालट केला.
पोपटराव यांनी केलेल्या कामातून प्रेरणा घेत राज्य सरकारने ‘आदर्श ग्राम योजना’ सुरु केली.
दरम्यान महाराष्ट्रात पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील आणखी 2 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
यामध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि रमन गंगाखेडकर यांनाही पद्मश्रीने गौरविले जाणार आहे.
महाराष्ट्रातील एकूण 12 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
यामध्ये एकूण 4 मराठी माणसांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
1) सुरेश वाडकर (कला)
2) राहीबाई पोपरे (कृषी)
3) पोपटराव पवार (समाजकार्य)
4) जहीर खान (क्रीडा)
5) डॉ. रमन गंगाखेडकर (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
6) करण जोहर (कला)
7) सरीता जोशी (कला)
8) एकता कपूर (कला)
9) कंगणा रनौत (कला)
10) अदनान सामी (कला)
11) सय्यद मेहबूब शाह कादरी (समाजसेवा)
12) डॉ. सॅन्ड्रा डीसोझा (वैद्यकीय)
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत एकूण 7 पद्मविभूषण, 16 पद्मभूषण आणि 118 पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली आहे.