गणेशोत्सवात मंडळातील बाप्पाचे दर्शन घेण्याची मजा काही औरच असते. बाप्पाची सुबक मूर्ती, त्या मागची खास संकल्पना, आकर्षक सजावट आणि मंडळांमधील विविध कार्यक्रमांमुळे गणेशोत्सवाला वेगळीच रंगत येते. उद्या 19 सप्टेंबर रविवार असल्याने सर्वत्र गणेशभक्तांची मोठी गर्दी होणार आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने भाविकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे.रेल्वे प्रशासनाने अधिकृत घोषणा केली आहे की, उद्या रविवारी कोणताही मेगाब्लॉक असणार नाही. त्यामुळे भाविकांच्या प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही.
मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत ब्लॉक असला तरी, मेन, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि बेलापूर-उरण पोर्ट मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसेल. पश्चिम रेल्वेवरही रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसल्याने गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना लोकल प्रवासात अडचण येणार नाही.
पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक:
पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच 19 आणि 20 सप्टेंबर दरम्यान सांताक्रूझ-माहीम स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे. अप जलद मार्गावर मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री 12:30 ते पहाटे4:30 पर्यंत हा ब्लॉक असेल.
हेही वाचा – Gauri-Ganpati Visarjan 2026: गौरी विसर्जनाची विधी काय? शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या
वसई-दिवा मेमूच्या वेळापत्रकात बदल:
रेल्वे ब्लॉकमुळे वसई-दिवा मेमूच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. वसई रोडहून सकाळी 9:50 वाजता सुटणारी 61003 क्रमांकाची मेमू दिव्यापर्यंत न जाता कोपर स्थानकातच थांबवली जाईल. तर दिवा-वसई रोड 61004 क्रमांकाची मेमू दिवा ऐवजी कोपर येथून सकाळी 11:45 वाजता सुटेल. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.