मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे पक्ष एकत्रितरित्या लढणार आहेत. या निमित्ताने तब्बल 20 वर्षानंतर दोघे भाऊ उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीत त्या दोघांची संयुक्तित मुलाखत सामना ऑनलाईनच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. ही मुलाखत खासदार संजय राऊत आणि निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. या मुलाखतीत विविध विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यातच शहरांमध्ये वाढत्या ड्रग्जचा पुरवठा हा गंभीर विषय घेण्यात आला यावर दोघांनीही आपले मत मांडले.
राज ठाकरे यांनी सांगितले की, ड्रग्ज या विषयाचा महानगरपालिकेशी काहीही संबंध नाही. याला केंद्र आणि राज्य जबाबदार आहे. ड्रग्ज कारवायांवरील धाडी गेल्या दहा वर्षात बंद झाल्या आहेत. शाळेच्या बाहेरील पानटपरीपर्यंत हे ड्रग्ज पोहोचलं आहे. याचं जर विश्लेषण केलं तर राजकारणात आलेला पैसा आणि रस्त्यापर्यंतर आलेलं ड्रग्ज याचा एकमेकांशी काय संबंध आहे, तोही जुळवून पाहायला हवा. राजकारणात निवडणुकांवरील एवढा खर्च, इतका मोठा डोलारा उभा राहतोय, यामागे कोण आहे, कोण याचा व्यवहार करतोय. त्यावर कुठलीही बंधनं येत नाहीत, कोणत्याही धाडी त्यावर पडत नाहीत. हे केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे.
याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री उठसूट सगळ्यांना क्लीनचीट देत आहेत. कारवाई झाल्यानंतर तो कारखाना कोणाचा आहे, हे तरी सांगा. आमच्यावर आरोप करताना तुमच्या बुडाशी काय जळतंय ते तरी बघा. बुड जळून खाक झाल्यावर काय उपयोग आहे. या सर्व प्रकारांचं विद्रुपीकरण झालंय. त्यामुळे हे वारंवार सांगावं लागतंय की, देशाला पंतप्रधान हवा, मात्र भाजपला पंतप्रधान आहे. तसंच राज्याला मुख्यमंत्री हवा, परंतू तोही भाजपचा मुख्यमंत्री आहे. हे सगळे फक्त त्यांचा पक्ष आणि सत्ता एवढंच बघत आहेत. लोकं, नागरीक मेले तरी चालतील. त्यांची मुलं ड्रग्जच्या आहारी गेली तरी चालतील. त्याचे धंदे करणारे आपल्या बाजूला बसले तरी चालतील, पण आपल्याला सत्ता पाहिजे. ही वृत्ती झाली आहे. यासाठीचं सत्ता हातात असणं गरजेचं आहे. सत्ता आली तर त्यावर बंधन आणता येतील.