छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी एक भलताच अनोखा प्रकार पाहायला मिळाला. झोडेगाव येथील शेतकरी योगेश पडोळ यांनी आपल्या कांदा चाळीतील पहिला माल विक्रीसाठी चक्क आपल्या ‘थार’ गाडीतून आणला. पडोळ यांनी तब्बल 180 किलो कांदा गाडीतून आणला. नेहमी ट्रॅक्टर किंवा टेम्पोतून येणारा कांदा आलिशान थार गाडीत भरून बाजारात दाखल झाल्याचे पाहून व्यापारी आणि इतर शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. विशेष म्हणजे, या चांगल्या प्रतीच्या कांद्याला 3 हजार 600 रुपये प्रति क्विंटलचा समाधानकारक भाव मिळाला. दरम्यान, पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी कांदा सुका व ताडपत्रीने झाकूनच बाजारात आणावा, असे आवाहन लासूर स्टेशन बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव यांनी केले आहे.