कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पहिल्याच दिवशी मैदानावर कमालीचा तणाव पाहायला मिळाला. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या वादानंतर यशस्वी जयस्वाल श्रीलंकन खेळाडूच्या अंगावर धावून गेल्याचं पहायला मिळालं. यानंतर हा वाद इतका वाढला की दोन्ही खेळाडूंमध्ये धक्काबुक्कीही झाली. या घटनेनंतर क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आलं आहे. यशस्वी 45 धावांवर बाद होऊन माघारी परतत असताना ही घटना घडली.
दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची इतकी वाढली की ते एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि त्यांच्यात हेल्मेटचा थेट संपर्क झाला. इतर खेळाडूंनी त्वरित मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र या घटनेमुळे आता आयसीसीच्या शिस्तभंगाच्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेनंतर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून जयस्वालच्या वागणुकीवरून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर देखील जयस्वालने कमेंट करत उद्धटपणे उत्तर दिल्याचं समोर आलं आहे.
यावेळी हर्षा भोगले म्हणाले की, “असिथा फर्नांडोने जयस्वालला आऊट केलं. श्रीलंकेला माहिती होतं की, जयस्वाल त्याच्या चुकीने आऊट झाला. जसं जयस्वाल बाहेर जाऊ लागला. श्रीलंकेच्या खेळाडूने जयस्वालला काहीतरी म्हटलं. हो, कदाचित जे बोलले गेले ते बोलायला नको होते, पण जसे तुम्ही देता, तसेच तुम्हाला घ्यावेच लागते. अशा परिस्थितीत सर्वात सोपा मार्ग म्हणजे तिथून निघून जाणे. जयस्वालच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, त्याच्यात प्रचंड प्रतिभा आहे, पण तो आतून थोडा भांडखोर स्वभावाचा आहे”
“त्याच्यासारख्या विलक्षण क्षमतेच्या फलंदाजाला, समोरच्या व्यक्तीला त्याच्यावर मात करू देणे आणि त्याला अडचणीत आणणे, ही शेवटची गोष्ट मला हवी असेल. त्याच्यासारख्या विलक्षण क्षमतेच्या बॅटिंगला, प्रतिस्पर्धी संघाने त्याच्यावर मात करून थोड्या अडचणीत आणावं, असं मला मुळीच वाटणार नाही त्याला चिथावणी देण्यात आली होती, पण हा कसोटी क्रिकेटचा खेळ आहे. मला वाटले की ते धोक्याच्या पातळीपर्यंत थोडे जास्तच जवळ आले होते,” असं म्हणत हर्षा भोगले यांनी यशस्वी जयस्वालला सल्ला दिला.
त्यांच्या या व्हिडिओवर यशस्वी जयस्वालने कमेंट करत थेट उत्तर दिले, यावेळी त्याने म्हटलं की, “त्याने काय म्हटले हे तुम्हाला माहीत नसेल तर कृपया कोणताही निष्कर्ष काढू नका. जर कोणी मर्यादा ओलांडली तर त्यांना हे कळवून द्यायला हवे की भारत लढेल आणि प्रत्युत्तर देईल.”, यशस्वी जयस्वालचा हाच उद्धटणा त्याला आता महागात पडणार असल्याचं पहायला मिळत आहे.