मुंबई: मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील लाखो प्रवाशांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे उपनगरी रेल्वे वेळापत्रक लागू झाले आहे. या बदलांमुळे विरार, नालासोपारा, भाईंदर आणि डहाणू रोड परिसरातील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, दोन विरार फास्ट लोकलचा बोरिवली थांबा रद्द करण्यात आल्याने बोरिवलीतील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासनाने यावेळी एकूण लोकल फेऱ्यांची संख्या वाढवलेली नाही. त्याऐवजी कमी अंतर धावणाऱ्या काही लोकलचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही नवीन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विरार आणि डहाणू प्रवाशांसाठी मोठा दिलासा
यापूर्वी दादरहून डहाणूकडे जाणाऱ्या प्रवाशांना विरार येथे लोकल बदलावी लागत होती. आता हा त्रास कमी करण्यासाठी दादर ते डहाणू थेट लोकल सुरू करण्यात आली आहे. ही गाडी सायंकाळी 5.22 वाजता दादरहून सुटून रात्री 7.30 वाजता डहाणूला पोहोचणार आहे. त्याचबरोबर सकाळच्या गर्दीच्या वेळेत विरारहून सकाळी 8.23 वाजताची लोकल आता चर्चगेटपर्यंत धावणार आहे. त्यामुळे कार्यालयीन प्रवाशांना थेट चर्चगेटपर्यंत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
दोन सामान्य लोकल आता एसी
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलना वाढता प्रतिसाद मिळत असल्याने आणखी दोन फेऱ्या एसी करण्यात आल्या आहेत.
चर्चगेट ते बोरिवली – सायंकाळी 5.28
बोरिवली ते चर्चगेट – सायंकाळी 6.24
यामुळे आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी एसी लोकलची संख्या 145 वरून 147 झाली आहे.
बोरिवली थांबा का रद्द?
चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये बोरिवली येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी चढ-उतार करत असल्याने अनेकदा गर्दी आणि वाद निर्माण होत होते. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सायंकाळी 6.22 आणि 7.05 वाजताच्या चर्चगेट-विरार फास्ट लोकलचा बोरिवली थांबा रद्द करण्यात आला आहे.
pic.twitter.com/18iKvA0OAG — Western Railway (@WesternRly) August 31, 2026
नव्या आणि रद्द झालेल्या लोकलचे वेळापत्रक
नव्या/विस्तारित धीम्या लोकल
|
वेळ |
मार्ग |
|---|---|
|
सकाळी 7:46 |
भाईंदर – विरार |
|
सकाळी 11:58 |
वांद्रे – चर्चगेट |
|
रात्री 10:14 |
बोरिवली – भाईंदर |
|
रात्री 10:51 |
बोरिवली – विरार |
|
रात्री 11:51 |
विरार – बोरिवली |
|
मध्यरात्री 12:28 |
बोरिवली – भाईंदर |
रद्द करण्यात आलेल्या धीम्या लोकल
|
वेळ |
मार्ग |
|---|---|
|
सकाळी 9:56 |
चर्चगेट – बोरिवली |
|
सकाळी 10:50 |
बोरिवली – चर्चगेट |
|
सकाळी 11:00 |
चर्चगेट – मुंबई सेंट्रल |
|
दुपारी 1:16 |
चर्चगेट – बोरिवली |
|
दुपारी 2:30 |
बोरिवली – चर्चगेट |
|
रात्री 9:01 |
चर्चगेट – मुंबई सेंट्रल |
प्रवाशांनी काय लक्षात ठेवावे?
नव्या वेळापत्रकामुळे काही प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार असला, तरी बोरिवली थांबा रद्द झालेल्या फास्ट लोकलमुळे अनेकांना पर्यायी गाड्यांचा वापर करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्टेशनवरील डिजिटल डिस्प्ले, अधिकृत अॅप आणि घोषणांद्वारे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.