एल निनोच्या प्रभावामुळे संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून कोरडा दुष्काळ पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये गणरायाच्या आगमनापूर्वीच पावसाची जोरदार एन्ट्री होणार आहे. पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तावला असून घाटमाथा परिसरात यलो अलर्ट जारी केला गेला आहे. यावेळी कोकणासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडेल असे म्हटले जात आहे.
मुंबईत पनवेल, पालघर आणि ठाण्यात आज कमाल तापमान सुमारे 31 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता असून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कोकणात रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा- Gondia News: गोंदिया हादरलं! आमगावच्या दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना; 21 जखमी, 6 जण गंभीर
तसेच उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नसून पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच आज घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस तसेच मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातद पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
यावेळी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड आणि धाराशिवमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.