सध्या राज्याच्या अनेक भागांत श्रावणसरी ओसरल्या आहेत. ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असला तरी राज्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र काही ठिकाणी अजूनही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. हवामान विभागाच्या नव्या अपडेटमुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी महाराष्ट्रातील कोकण ते विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान मुंबईत पालघर, ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये उष्ण, दमट आणि कोरडे हवामान जाणवत आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील काही दिवसही जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याने हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशीम जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कमी झाला असून आज सकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरू असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांना धान पिकासाठी पोषक असे वातावरण निर्माण झालं असल्यामुळे धान पिकाला याचा फायदा होणार आहे. आणि उकड्यापासून हैराण झालेला नागरिकांना दिलासा मिळणार आहे.