गेल्या काही दिवसांत कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाने झोडपलं आहे. राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसाच्या अंदाजाबाबत IMD ने महत्त्वाची माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील सात दिवस खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.
या सात दिवसांत देशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. पावसाच्या या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठीही हवामान विभागाने महत्त्वाचे अलर्ट जारी केला आहे.
यावेळी मुंबईसह पालघर, ठाणे आणि नवी मुंबईत हलक्या सरींची शक्यता आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि घाटमाथ्यावरही वातावरण कोरडे राहणार असून उत्तर महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसाची विश्रांती असून पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. यावेळी पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात पुढील काही दिवस हवामान कोरडे व दमट राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने दिली.