राज्यात अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. घाटमाथा परिसर सोडला तर इतर ठिकाणी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे. दरम्यान आज हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तर घाटमाथ्यासह काही जिल्ह्यांत पुन्हा हवामानात मोठे उलटफेर जाणवत आहेत. मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथे यलो अलर्ट असून उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस किंवा पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.
मुंबईत पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे वादळी सरींची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिक वगळता कोणत्याही भागांत पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे हलका ते मध्यम पाऊस तसेच पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. मात्र अनेक ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला असून 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह हलका ते मध्यम, काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात गेल्या अचानक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. श्रावणाचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
1 ते 9 ऑगस्टदरम्यान काही प्रमाणात पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. सोमवारी सकाळपर्यंत विभागात केवळ 0.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाच्या खंडामुळे पिकांना पाण्याची गरज भासत असून मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्याची चिंताही वाढली आहे. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत या आठवड्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दमदार पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
पावसाची दडी; शेतकऱ्यांची चिंता वाढली
मान्सूनच्या पावसात पिके उभी तर झाली मात्र अमरावती जिल्ह्यात गेल्या 15 दिवसाच्या खंडामुळे पिकांवर विविध संकटें येऊ लागली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूगावर कीडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. दरम्यान पेरणी केल्यानंतर पावसाचा प्रदीर्घ खंड झाल्यामुळे उगवण क्षमता कमी झाली, त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. दरम्यान काही भागात पिके उगवली, तर लगेच खंड पडल्याने रसशोषक कीडींसह पाने खाणाऱ्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फवारणी करूनसुद्धा पिकांवर रोगराई वाढतच गेली.. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी सुद्धा फवारणीचे नियोजन थांबवले आहे. पावसाची हीच स्थिती सप्टेंबरमध्ये कायम राहिली तर आगामी रब्बी हंगामातील पेरणी करायलासुद्धा शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागेल, असे दिसून येते. दरम्यान रोगराईमुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.