राज्यात गेल्या काही दिवसांपासून बदलते वातावरण पाहायला मिळत आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. मे महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला असून पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तावली आहे. आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील 13 जिल्ह्यांत उष्णतेचा मोठा अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा, नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. त्याचसोबत राज्यात काही भागात अजून देखील वादळी पावसाची शक्यता आहे.
यावेळी कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रत्नागिरी येथे कमाल तापमान 32-35 अंशांच्या आसपास असून कोकणात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यावेळी मुंबई आणि नवी मुंबईत उष्ण आणि दमट हवामान राहणार असून सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात तापमान वाढल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. तरी देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, सोलापूर याठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर पुण्यात मात्र उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात हवापाटल झाली असून नाशिक, जळगाव येथे कमाल तापमान 38-43 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. यादरम्यान मध्य महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी संकट घोंघावत आहे.
विदर्भ गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा जाणवत आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड येथे कमाल तापमान 38-42 अंशांच्या दरम्यान असून सर्वच जिल्हे उष्णतेनं होरपळून निघत आहे.
पावसामुळे आतापर्यंत कुठे कुठे काय नुकसान झाले-
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात काल सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील छत उडाले तर झाडांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाली. मुख्य मार्गावर झाडे उन्मळुन पडल्याने काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर मळणी सुरू असलेल्या मका आणि धानपिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
भंडारा जिल्ह्यात संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्याने लाखनी पालांदूर राज्य मार्गावर झाडे कोसळली व झाडे विद्युत तारांवर पडून विद्युत प्रवाह असलेले खांब रस्त्याच्या कडेला कोसळले यामध्ये सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र, झाडे विद्युत खांबावर पडल्यामुळे वाहतूक थांबली होती काही काळ वाहतुकीचा खोडांबाही झाला होता. काही वेळानी नागरिकांनी रस्त्यावरील झाडे बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. जिल्ह्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका परिसराला अवकाळी पावसाने जोरदार झोडपले. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे काही काळ नागरिकांची चांगली तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, या अवकाळी पावसामुळे वातावरणातील तापमानात घट झाली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला, तर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेच्या झळांपासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.