वाशिम तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील ५६ वर्षीय शिक्षक दिलीप बोरकर याने तिसरी आणि चौथीच्या अनेक विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा गंभीर आरोप असून, या प्रकरणी वाशिम पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थिनींना मांडीवर बसवून त्यांच्याशी गैरवर्तन करत होता. भीतीपोटी लहान मुली हा प्रकार कुणालाही सांगू शकत नव्हत्या. मात्र, एका घाबरलेल्या चिमुकलीने अखेर एका शिक्षिकेकडे आपली व्यथा मांडल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. ही माहिती गावात पसरताच ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी आरोपी शिक्षकाला पकडून चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीसह इतर विद्यार्थिनींचेही इन-कॅमेरा जबाब नोंदवले आहेत. शाळेत आणखी काही विद्यार्थिनींना अशाच प्रकारचा त्रास झाला आहे का, याचाही तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी शिक्षकाकडूनच विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याच्या आरोपामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळांमधील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणीही पुढे येत आहे.
दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, आणखी पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.