Vijay Hazare Trophy: भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडून विराट कोहली सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुसाट सुटला आहे. पहिल्या सामन्यात झंझावाती शतक झळकावल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात विराटने बॅटने असा पराक्रम केला आहे जो आजवर क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही जमला नव्हता. ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूचा अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढत विराटने आता 'लिस्ट-ए' क्रिकेटमध्ये जगातील सर्वोच्च शिखर गाठले आहे.
मायकल बेव्हनचा 'तो' विक्रम आता इतिहास जमा
क्रिकेट विश्वात सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखले जाणारे ऑस्ट्रेलियाचे मायकल बेव्हन यांच्या नावावर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीचा जागतिक विक्रम होता. बेव्हन यांनी 57.86 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. अनेक वर्षे हा विक्रम अभेद्य होता, मात्र विराट कोहलीने उत्तराखंडविरुद्ध 77 धावांची खेळी करताच ही सरासरी 57.87 वर नेली आणि बेव्हन यांना दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.
शतक हुकले तरी विक्रम साधला
विराट कोहली आज सलग दुसरे शतक झळकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. त्याने केवळ 61 चेंडूंत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या जोरावर 77 धावांची तडाखेबंद खेळी केली. अवघ्या 23 धावांनी त्याचे शतक हुकले असले, तरी या खेळीने त्याला जागतिक विक्रमाचा मुकुट मिळवून दिला.
विराटची 'लिस्ट-ए' कारकीर्द
सामने: 344
एकूण धावा: 16,027
शतके: 58
अर्धशतके: 85
सरासरी: 57.87 (नवा जागतिक विक्रम)
काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडणाऱ्या विराटने आता जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. ज्या सरासरीपर्यंत पोहोचणे दिग्गज फलंदाजांसाठी स्वप्न होते, तिथे आता विराट कोहलीचा दबदबा निर्माण झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.