राज्यात सध्या स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्य करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान अशोक खरात विरोधात तक्रारदारांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी देखील माध्यमांना धक्कादायक माहिती दिली आहे. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी खरात प्रकणासंबंधी कोणत्या तरी पेन ड्राईव्हचा खुलासा केला आहे. ज्यात ते म्हणाले की, पुरावा संपवण्यासाठी खरातचे एनकाउंटर केले जाईल, तसेच पेन ड्राईव्ह समोर आले तर दोघा तिघांची विकेट देखील जाईल. असा धक्कादायक दावा विजय वडेट्टीवारांनी केला आहे.
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, “मी जबाबदारीने सांगतो जर ते पेन ड्राईव्ह समोर आलं तर मंत्रीमंडळातील दोन ते तीन जणांची विकेट जाईल. पण ते आणू शकणार नाहीत ते प्रकरण दाबल जाईल. सोयीच जितक आहे तितकचं बाहेर काढलं जाईल. पुरावा संपवण्यासाठी खरातचं एनकाउंटर देखील होईल…” असा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा- Maharashtra Post Office Threat Call : सर्व पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात सर्वत्र खळबळ
दरम्यान भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिस तपासाला नवे वळण लागले आहे. नाशिक सत्र न्यायालयात अशोक खरातविरोधात युक्तिवाद सुरु असताना सरकारी वकिलांनी महत्त्वाची माहिती दिली होती. अशोक खरातने कस्तुरीसाठी हरिणाची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्याप्रकरणी आता बड्या आयुर्वेदिक औषधे व जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. तसेच खरातने या दुकानातून हरिणाची कस्तुरी व जडीबुटी खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिकरोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे. तसेच भोंदू बाबा अशोक खरात यांच्या शिवाणिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी होणार आहे.