पुण्यातील गणेशोत्सवात डीजे साउंड सिस्टिमच्या विरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. देवी-देवता, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी बापट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटिशीत बापट यांनी 48 तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नोटिशीनुसार, ठराविक मुदतीत समाधानकारक खुलासा किंवा माफी न दिल्यास बापट यांच्याविरोधात फौजदारीसह अन्य कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गणेशोत्सवात वाजणाऱ्या डीजे साउंड सिस्टिमच्या विरोधात विद्यानंद बापट सातत्याने भूमिका मांडत आहेत. त्यांच्या मुलाखतीतील काही मुद्दे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, त्यानंतर त्यांच्या वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
वकील प्रदीप नाईक यांनी पाठवलेल्या नोटिशीत दावा करण्यात आला आहे की, बापट यांनी गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याबाबत केलेली काही विधाने श्रद्धाळूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आणि अवमानकारक स्वरूपाची आहेत. त्यामुळे संबंधित वक्तव्यांबाबत त्यांनी सार्वजनिकरित्या स्पष्टीकरण द्यावे आणि बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मात्र, या नोटिशीत अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. ध्वनीप्रदूषण, लाऊडस्पीकर, मिरवणुका किंवा सार्वजनिक उत्सवांबाबत कायदेशीर आणि सभ्य पद्धतीने मत मांडण्याच्या अधिकाराला कोणताही विरोध नसल्याचे ॲड. नाईक यांनी नमूद केले आहे. परंतु, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक श्रद्धा, आराध्य दैवतांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, एका व्यक्तीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी होऊ नये, असेही नोटिशीत अधोरेखित करण्यात आले आहे.
दरम्यान, या नोटिशीवर विद्यानंद बापट यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. आता ते 48 तासांच्या मुदतीत स्पष्टीकरण देतात की पुढील कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारला जातो, याकडे सर्वांचे ल
क्ष लागले आहे.