जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी वादात अडकलेल्या आयसीआसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी चंदा कोचर या बेमुदत रजेवर राहतील अशी घोषणा करतानाच, आयसीआयसीआय बँकेने मुख्य परिचालन अधिकारी म्हणून संदीप बक्षी यांच्या नियुक्ती करीत असल्याचे सोमवारी जाहीर केले.
आयसीआयसीआय बँकेने याबाबतचं पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली. बक्षी हेच बँकेचा सर्व व्यावसायिक कारभार पाहतील. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे.
संदीप बक्षी यांच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे सीओओ पदाचा भार दिल्याने, त्यांच्या रिक्त झालेल्या आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एन एस कन्नन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंदा कोचर यांनी व्हिडियोकॉन समूहाला कर्ज देताना आपल्या कुटुंबीयांचे हितसंबंध सांभाळले असा त्यांच्यावर आरोप असून, त्याची सध्या चौकशी सुरू आहे.